Nashik Anuradha Theater : 1975 साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजकुमार कोहली (Rajkumar Kohali) दिग्दर्शित व सुनील दत्त, जितेंद्र, रीना राय यासारखे कलाकार असलेला 'नागिन' (Nagin) या चित्रपटाने नाशिकमधील अनुराधा सिनेमागृहाचा (Anuradha Theater) शुभारंभ झाला होता. आज या सिनेमागृहास ४७ वर्ष झाली असून जीर्ण अवस्थेत असलेले सिनेमागृह आजपासून पाडण्यास सुरवात झाली आहे. 


नाशिकला (Nashik) ऐतिहासिक पासून ते सांस्कृतिक राजकीय परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे पूर्वीपासून नाशिकमध्ये अनेक नातूंगृहे, सिनेमागृहे आजतागायत तग धरून आहेत. त्यातीलच एक म्हणजे नाशिकरोडचे अनुराधा सिनेमागृह होय. एकेकाळी उत्तर महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या नाशिकरोड येथील प्रसिद्ध अनुराधा चित्रपटगृहाचा इतिहास मात्र आजपासून जमीनदोस्त करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांची परंपरा राखून असलेला इतिहास जमीनदोस्त होताना अनेक नाशिककर हळहळले आहेत. 


नाशिकचे उद्योजक बाबूशेठ कलंत्री यांनी हे चित्रपटगृह 1975 ला गुढीपाढव्याच्या मूहूर्तावर सुरू केले होते. त्यावेळी सुनील दत्त, रिना राय आदींची प्रमुख भूमिका असलेचा नागीन चित्रपट प्रथम या चित्रपटगृहात झळकला होता. उत्तर महाराष्ट्रातील हे त्यावेळचे मानाचे सिनेमागृह होते. नाशिकमधील एकमेव वातानुकूलित सिनेमागृह अशी त्याची ओळख होती. सिनेमागृह पाहण्यासाठी अन्य जिल्ह्यांतून रसिक येत असतं. सुरुवातीला सकाळी दहाला इंग्रजी, बाराला मॅटिनी आणि नंतर तीन हिंदी असे पाच खेळ होत असत. 


दरम्यान 1975 च्या सुमारास या सिनेमागृहाचे उदघाटन होते. त्यावेळी स्वतः दिग्दर्शक राजकुमार कोहली, सिने अभिनेते सुनील दत्त, रीना राय, जितेंद्र हे सिने कलाकार उपस्थित होते. सुरुवातीला या चित्रपटगृहाचे रोज 5 शो दाखविले जात असत. सकाळी दहा वाजता इंग्रजी चित्रपट, दुपारी बारा वाजता मॅटिनी चित्रपट व नंतर 3 शो असे एकूण पाच शो दाखविले जात असत. त्याकाळी अनुराधा सिनेमागृहात प्रत्येक शो हाउसफुल असायचा. या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून सिने रसिक केवळ चित्रपटगृह बघण्यासाठी येत असत. त्या काळात मुंबई बरोबर अनुराधा सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होत असत.


दादा कोंडकेंचे चित्रपट 100 दिवस चालायचे! 
चित्रपटगृहात दादा कोंडके (Dada Kondke) यांचे प्रत्येक चित्रपट किमान 16 आठवडे मुक्काम करीत असत. त्यानंतर हिंदी चित्रपटापैकी फिरोज खान यांचा कुर्बानी जितेंद्र कलाकार असलेला 'मेरी आवाज सुनो' या चित्रपटाचे 5 शो होत असत. मनोज कुमार, हेमा मालिनी यांचा 'दस नंबरी' हा चित्रपट सुद्धा दहा आठवड्याचा त्याचप्रमाणे जितेंद्र यांचा 'आशा' हा चित्रपट सुद्धा दहा आठवडे सुरू होता. अशा अनेक चित्रपटांनी अनुराधा सिनेमागृह गाजले होते. दादा कोंडकेंचे चित्रपट येथे प्रथम झळकायचे. दादांचे बहुतेक चित्रपट किमान शंभर दिवस चालत असत. जितेंद्र, हेमामालिनी यांच्या मेरी आवाज सुनो चित्रपटाचे सहा खेळ होऊन विक्रम झाला होता. कुर्बानी, दस नंबरी, हम किसेसी कम नहीं, आशा आदी चित्रपटही गाजले.


2015 साली अनुराधा सिनेमागृह बंद झाले... 
दरम्यान 1990 नंतर काळ बदलला. रेडिओची जागा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीने घेतली. यामुळे घराघरांत टीव्हीचा आवाज ऐकू येऊ लागला. या दरम्यान टीव्हीवर दूरदर्शन मालिका, चित्रपट झळकू लागले. घरबसल्या नागरिकांना पिच्चर पाहायला मिळत असल्याने त्याचा परिणाम सिनेमागृहावरती झाला. परिणामी त्यानंतर सिनेमागृह प्रेक्षकाविना ओस पडू लागले. नाशिक शहरातील अनेक चित्रपटगृह त्यामुळे बंद पडली. त्यात नाशिकरोड येथील रेजिमेंटल व बिटको चित्रपटगृहाचा समावेश होता. एक मे 2015 साली अनुराधा सिनेमागृह बंद करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी या चित्रपटगृहाला मोठी आग सुद्धा लागली होती. गेल्या सात वर्षापासून बंद असलेले सिनेमागृह अखेर आजपासून पाडण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी लवकरच व्यावसायिक संकुल उभारले जाण्याची शक्यता आहे.