Nashik NMC : गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना सुखकर प्रवास दणाऱ्या रिक्षा आता नव रूप घेणार असून लवकरच या रिक्षांचे ई रिक्षा मध्ये रूपांतर केले जाणार आहे. नाशिक मनपाने शहरात ई रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 


देशासह राज्यात इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार नाशिक महानगरपालिकेने (NMC) शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आखली आहे. त्यानुसार शहरात ई रिक्षा रस्त्यावर आणण्यासाठी संदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.


नाशिक शहरात अनेक पर्यटनस्थळ असल्याने भाविकांची गर्दी असते. त्यामुळे अनेकदा सार्वजनिक वाहतुकीची साधने कमी पडतात. अशावेळी रिक्षाचा वापर केला जातो. मात्र अलीकडच्या काळात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेला ईव्ही प्रमोशन प्लॅन अंतर्गत पुढील पाच वर्षांत राज्य सरकारकडून एकूण 124 कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे. 


दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यासाठी राज्य सरकारकडून पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी 24 कोटी रुपये अनुदान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक मनपाने तयार केलेला अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेने दहा हजार पेट्रोल/डिझेल-आधारित ऑटो रिक्षा ई-रिक्षात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. 


खर्चाचे नियोजन 
प्रत्येक रिक्षाला ई-रिक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक रिक्षाचे रीट्रोफिट करण्यासाठी नाशिक मनपा खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 35 हजार रुपये देईल. तर उर्वरित 50 टक्के रक्कम वाहन मालकाला खर्च करावी लागणार आहे. अनुदानातील काही रक्कम ऑटोरिक्षांच्या मालकांना ई-रिक्षांमध्ये रुपांतरित करण्यासाठी अनुदान देण्यासाठी खर्च करावी लागणार आहे.                                                                                                                                                                                                            106 ठिकाणी चार्जिंग स्टेशन 
येत्या पाच वर्षांत दहा हजार ऑटोरिक्षांचे ई-रिक्षात रूपांतर करण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च करणार आहोत. याशिवाय, नाशिक महानगर पालिका या इ रिक्षांच्या चार्जिंगसाठी शहरात 106 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. संबंधित चार्जिंग ठिकाणांची पाहणी देखील मनपा अधिकाऱ्यांनी केली आहे.