Nashik Malegaon News : शिवसेना (shivsena) मंत्री दादा भूसेंचे (Dada Buse) होमग्राउंड असलेल्या मालेगावमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा होणार असून दादा भुसे हे ठाकरेंच्या निशाण्यावर असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांकडूनही भूसेंवर टिकास्त्र सोडलं जात आहे. मात्र एकीकडे ही परिस्थिती असतांनाच दुसरीकडे मालेगावमध्येच मुंबई - आग्रा महामार्गावर दादा भूसेंचे सुपुत्र अविष्कार भुसे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले होर्डींग लावण्यात आले आहेत. 


आज उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये (Malegaon) जाहीर सभा होत असून यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray Sena) जोरदार तयारी सुरु आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून आज सकाळी त्यांनी सभा स्थळाची पाहणी केली. त्यानंतर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांचा मालेगाव हा मतदारसंघ असून ती जमेची बाजू आहे. आज उद्धव ठाकरेंची सभा होत असताना दोन्ही गटांमध्ये चांगलेच कुरघोडीचे राजकारण घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे चिरंजीव अविष्कार भुसे (Avishkar Bhuse) यांचा भावी खासदार असा उल्लेख केलेले पोस्टर नाशिकमध्ये दिसून आले होते. त्यानंतर आज पुन्हा मालेगाव शहरात अविष्कार भुसे यांची भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले पोस्टर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात आधीच आरो-प्रत्यारोप, विसंवाद आणि कुरघोडीचे राजकारण सुरू असताना या बॅनरबाजीने आणखी भर पडल्याचे दिसून आले. दुसरीकडे आज उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा होत असल्याने शिवसैनिकांचे सगळे लक्ष मालेगाववावर आहे. असे असताना पालकमंत्री भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांची भावी खासदार  म्हणून झळकणाऱ्या होर्डिंगची शहरासह जिल्ह्यात चर्चा आहे. मालगेव शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर भावी खासदार अशा आशयाचे होर्डिंग लागलेले आहेत. कपाळी टिळा लावून अविष्कार भुसेसंह दादा भुसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो या बॅनरवर दिसून येत आहेत. 


काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात होर्डिंग्स


काही दिवसांपूर्वी देखील अविष्कार भुसे यांच्या वाढिदवसानिमित्त नाशिक शहरात होर्डिंग्स लागले होते. त्यामुळे देखील जिल्हाभरात चर्चा झाली होती. अविष्कार भुसे (Avishkar Bhuse) यांचा भावी खासदार असा उल्लेख केलेले पोस्टर नाशिकमध्ये दिसून आले होते. अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टर बाजी करण्यात आली होती. यावर दादा भुसे यांनी तातडीने हे बॅनर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये असताना मुंबई आग्रा महामार्गावर पोस्टर्स लावण्यात आले आहेत.