Nashik Udayanraje Bhosale : एक ते भगतसिंग होते, जे देशासाठी शहीद झाले..दुसरे हे भगतसिंह यांनी त्या पदावर राहताना तारतम्य बाळगले पाहिजे..उद्या कोणी पण अरे तुरेची भाषा वापरेल. एकेरी भाषेत उल्लेख करतात..तुमची लायकी काय आहे? शिवाजी महाराज यांनी जे केलं, तिथे आपण पोहोचू शकत नाही, अशा शब्दांत उदयनराजेंनी भगतसिंग कोश्यारींचा (Bhagatsingh Koshyari) समाचार घेतला आहे. 


नाशिकमध्ये (Nashik) माध्यमाशी संवाद साधतांना त्यांनी आजच्या राज्यपालांच्या (Governor) राजीनामा मंजुरीवर भाष्य केले आहे. यावेळी उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले की, राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. अशा महत्वाचा पदावर असणाऱ्या व्यक्तींनी, मग कुणीही असो, त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे. कारण नसताना कुठलेही वक्तव्य करणे, यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जातीजातींमध्ये मतभेद निर्माण होतात, हे कशाकरता? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. 


जगात मोठे योद्धे होऊन गेले. या सर्वांनी साम्राज्य वाढवण्याकरता युद्ध केले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकांच्या कल्याणासाठी राज्य केले. त्यांनी लोकांनी न्याय मिळवूं देण्याकरता स्वराज्य उभे केले. आज आपण छत्रपती शिवरायांना देव्हाऱ्यात पुजतो, अशा महापुरुषांविरोधात गरळ ओकणे चुकीचे आहे. ज्यांची उंची नाही, कधी ती उंची गाठू शकत नाही, असे लोकं जेव्हा वक्तव्य करतात, ही विकृती आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांच्या विचारांची व्याप्ती ही संकुचित आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशाला कुटुंब समजले होते. मात्र आताच्या लोकांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. पूर्वी असं होतं की परिवार म्हणजे समाज, पण आता हे सगळं बदललंय, आता परिवार म्हणजे फक्त मी आणि मी..एवढं व्यक्ती केंद्रित झालंय, असे उदयनराजे म्हणाले. 


छत्रपती शिवाजी महाराज फक्त मते मिळवण्यासाठी आहेत का? माझी विनंती आहे की, शिवाजी महाराज यांचा आदर करा. त्यांचा अवमान खपवून घेणार नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान या सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला. खंत वाटते की, उशीर झाला आहे..एक म्हण आहे, वेळेत जर निर्णय घेतला, तर बरंच काही सावरता येतं, असा सल्लाही उदयनराजेंनी दिला आहे. 


राजकारणात निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे.... 


छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले. त्यामुळे स्वराज्य उभे राहिले. आज मात्र फक्त राजकारणासाठी वापर केला जात आहे. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करणं, आपलं परम कर्तव्य आहे. माझा काही कुणाशी व्यक्तीद्वेष नाही. अन्याय झाला, मग अन्यायाविरोधात माझा विरोध असतोच. मात्र कोश्यारी यांचे वय बघता त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. निवृत्तीचे वय जसे ठरवले जाते, तसे राजकारणात देखील निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे. मग कुणी खासदार असो की आमदार असो यांचं असं वय ठरलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की, तरुणांना वाव दिला पाहिजे..पण एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ऐन उमेदीतील वर्ष समजून घेतले पाहिजे. राज्यपाल या पदावर अनुभव असलेले, पण वय जास्त नसलेले व्यक्ती याबद्दल विचार करावा. नवीन राज्यपाल यांचे मनापासून स्वागत आहे. त्यांना जे काही सहकार्य लागेल, ते करू, असेही ते म्हणाले.