Nashik Sinnar Accident : बसचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता, हळू चालव म्हणून आम्ही दोन वेळा त्याला सांगितले होते, आम्ही पुढच्या सीटवर आदळायचो एवढ्या जोऱ्यात तो ब्रेक मारायचा. झोपेत असताना मोठा आवाज झाला, खिडकीची काच फोडून बाहेर उडी मारली, असा थरारक अनुभव सिन्नर बस (Sinnar Bus Accident) अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितला


मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 45 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. तसेच उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी (Shirdi Sai Baba) निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला. या अपघातात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून उड्या मारून जीव वाचविल्याचे सांगितले. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या. काही दरवाजातून कसेबसे निसटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 


प्रत्यक्षदर्शी प्रवासी दिनेश राठोड म्हणाले कि, बसचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता, हळू चालव म्हणून आम्ही दोन वेळा त्याला सांगितले होते, पण तो ऐकत नव्हता अशी माहिती बसमध्ये मागून दुसऱ्या सीटवर बसलेल्या प्रत्यक्षदर्शी प्रवासी दिनेश राठोड यांनी एबीपी माझाला दिली आहे. बसचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता, हळू चालव म्हणून आम्ही दोन वेळा त्याला सांगितले होते, आम्ही पुढच्या सीटवर आदळायचो एवढ्या जोऱ्यात तो ब्रेक मारायचा. सकाळी अपघात झाला. तेव्हा बसमधील सर्व जण झोपेत होते, अंधार होता ट्रकला धडक झाली तेव्हा मोठा आवाज झाला, सर्व घाबरले होते, बस पलटी झाली होती. मी खिडकीची काच फोडून बाहेर उडी मारली, काहीच कळत नव्हते.


ते पुढे म्हणाले, अपघात झाला तेव्हा, आम्ही सेकण्ड लास्ट सीटवर बसलो होती, सर्व प्रवाशी झोपले होते, गाडीमध्ये अंधार होता, अपघातावेळी एकदम जोरात आवाज आला. जेव्हा वाटलं की काहीतरी झालं तर आमची गाडी समोरच्या गाडीला ठोकल्याचे जाणवत होते. त्यानंतर आम्ही अंधारामध्ये मागच्या खिडकीचा काच फोडून तिथून बाहेर पडलो. 


मोरीवली गावात शोकाकुल वातावरण 
अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी काल रात्री 15 बस करून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातील एका बसचा पहाटेच्या सुमारास नाशिकच्या (Nashik) घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. यात मृत्युमुखी पडलेले बहुतांशी भाविक हे अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचं वृत्त समजताच मोरीवली गावातील रहिवासी अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले. मोरीवली गावाच्या इतिहासातील इतकी भीषण अपघाताची ही पहिलीच घटना असून एकाच वेळी गावातील तब्बल 10 जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.