Nashik News : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) गेल्या चार दिवसांपासून पारा सातत्याने 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने नाशिककर घामाघूम झाल्याचे पाहायला मिळत होते. अखेर आज नाशिककरांना दिलासा मिळाला असून आजचे तापमान 36 अंशावर येऊन ठेपल्याने हायसे वाटले आहे. दुसरीकडे मालेगाव शहरात मात्र उष्णतेची लाट कायम असल्याचे चित्र आहे. 


गेल्या आठवडाभरापासून शहर परिसरात (Nashik Temperature) उष्णतेची लाट कायम आहे. शहरात सातत्याने तापमानाचा (Temprature) चाळीशीच्या आसपास राहत असल्याने शहरातील नागरिक घामाघूम झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे दुपारी देखील नाशिककर बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. अशातच दोन दिवसांपासून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. नाशिक शहरातील कालचे तापमान 36.3 अंश होते तर आज 36.1 अंश नोंदविले गेले आहे. त्यामुळे आज शहरात फारसा उकाडा जाणवला नसल्याचे दिसून आले. मात्र राज्यात पुढील काही दिवसांत तापमान कमी अधिक होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 


तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) उन्हाचा पारा चढताच आहे. मालेगाव शहरातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असून, सलग तिसऱ्या दिवशी ही वाढ कायम होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मागील आठवड्यातील गुरुवारी शहराचे तापमान 43.3 नोंदविल्या गेल्यानंतर शुक्रवारी पुन्हा तेवढेच तापमान राहिले, तर शनिवार व रविवारी तापमानात काही अंशी वाढ पाहावयास मिळाली. रविवारी मात्र दुपारी हवा सुटून वारे वाहत असल्याने तापमानाची तीव्रता काही अंशी जाणवत नव्हती. मात्र सलग तीन से चार दिवसांपासून तापमान वाढले  आहे.


मालेगावात उष्णतेची लाट 


राज्यात बुधवारी झालेल्या उच्च तापमानाच्या शहरांच्या यादीत मालेगावचा क्रमांक आहे. जळगावखालोखाल दुसरा लागला होता. त्यात दोन दिवसांत भर पडली आहे. तीव्र उन्हाच्या झळांनी शहरवासीय हैराण झाले असून, यंदाचा उन्हाळावेगळाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरवर्षी मालेगावला सरासरी 43 ते 45 अंश तापमान राहते. गेल्या वर्षी सलग तीन ते चार वेळा शहराचे तापमान 40 अंशांवर पोहोचले होते. मात्र त्याचा यापूर्वी इतका त्रास झाला नव्हता, इतका यावेळेच्या तापमानाचा होत आहे. यंदाच्या उन्हाने शरीराची आग होणे, डोके दुखणे, चक्कर येणे आदी त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 


शहरातील रस्ते सामसूम 


मालेगाव शहरात सकाळी दहापासून सामसूम होत असून, सायंकाळी सहानंतर तुरळक गर्दी बाजारपेठांमध्ये दिसत आहे. त्यामुळे ऐन उन्हात ग्राहकाची वाट पाहत बसण्याशिवाय रस्त्यावरील दुकानदारांकडे दुसरा पर्याय नाही. तर मोठ्या प्रमाणावरील स्थानिक दुकानदार दुपारी आपली आस्थापने बंद ठेवत आहेत. वाढत्या तापमानामुळे थंडावा देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना मागणी वाढली असून, माठांच्या किमती देखील वाढल्या आहेत. शहर व परिसरात उन्हापासून बचावासाठी उपरणे, टोपी, गॉगल आदींचा वापर वाढला आहे. सायंकाळी सातनंतर नागरिकांची बाजारात गर्दी असल्याचे चित्र आहे.