Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांची लाचखोर वृत्ती काही केल्या कमी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी वडनेर भैरव येथील दोन पोलीस शिपायांना लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता एका तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार लाचेची (Bribe) मागणी करणाऱ्या नांदगाव (Nandgoan) येथील तलाठी युवराज मासोळे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकड्याने महसूल विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी नांदगाव येथील तलाठी युवराज रामदास मासोळे यांच्या कडे जमिन जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तलाठी मासोळे यांनी सदर सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात 5000 रुपयांची मागणी केली असता दोन हजार रूपये आगाऊ म्हणून देण्याचे ठरले असता तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार सोमवार (दि. 13) रोजी दुपारी तीन वाजता जुन्या तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालयात नाशिक येथील पथकाने सापळा रचून तलाठी मासोळे यांना 2000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र पवार, पोलीस हवालदार प्रकाश डोंगरे, पो.ना. प्रणय इंगळे सहभागी झाले होते. दरम्यान, यापूर्वी देखील काही महिन्यांपूर्वी महसूल विभागातील तलाठ्यास सापळा रचून यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.
दरम्यान मागील काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे चर्चेत आले आहे. मागील दोन वर्षांत मालेगाव विभागात लाचखोर तीन वरिष्ठ कर्मचारी आणि आठ कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिकच्या ग्रामीण पोलिसांत वाढती लाचखोर प्रवृत्ती पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारी ठरत आहे.
'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' चा विसर
एकीकडे पोलीस प्रशासनाचे ब्रीदवाक्य असलेले 'सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय' या लाचखोर प्रवृत्तीमुळे कुठेतरी फोल टहार्ट असल्याचे दिसत आहे. या ब्रिदवाक्याचा अर्थ असा कि सामान्य जनतेची सुरक्षा आणि गैर वर्तन करणाऱ्यांना चाप लावणे होय. मात्र या ब्रिदवाक्याचा विसर पोलिसांना पडला कि काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे.