Nashik Bawankule : अध्यक्षांनी जयंत पाटील यांच्याबाबतीत बरोबर निर्णय घेतला असून त्यांना तर अधिवेशना पुरतंच निलंबित केलं आहे. मात्र आम्हाला वर्ष वर्ष निलंबित करून त्यांनी मुघलशाही केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. 


प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक येथील खान्देश महोत्सवाला उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला बावनकुळें यांच्यासह गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर बोलताना त्यांनी जोरदार टीका केली आहे. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष होते, तेव्हा काही दिवे लावले नाही. त्या सरकारच्या काळात कधी नागपूरला अधिवेशन झालं नाही. आणि आता झालं तर राष्ट्रवादीचे जयंत पाटलांनी सहन न करण्यासारखे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे अध्यक्षांनी बरोबर निर्णय घेतला असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले. 


बावनकुळे पुढे म्हणाले, मागील अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना अधिवेशन झाले नाही, आता आमच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे नागपूरला येऊन गेले, पण हाऊसमध्ये आले नाही, ते काँग्रेसच्या कार्यालयात गेले. संजय राऊत असो, उद्धव ठाकरे असो हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसलेले आहे. ते नागपूरला आले, तरी फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांची नागपूरला येण्याची वेळ होती, मात्र ते नागपूरला आले नाही. शिवाय त्यावेळी काही चूक नसताना आमचे बारा आमदार निलंबित केले, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, पण आम्ही स्थिर होतो. पण आता जयंत पाटील यांनी अध्यक्षांबाबत चुकीचे विधान केल्याने आम्ही निलंबनाचा प्रस्ताव मांडला. यावर अध्यक्षांनी योग्य निर्णय घेत त्यांचे निलंबन केल्याचा चांगला निर्णय घेतला असल्याचे बावनकुळे म्हणाले. 



तसेच अध्यक्षांनी जयंत पाटील यांच्याबाबतीत बरोबर निर्णय घेतला असून त्यांना तर अधिवेशन पुरतंच निलंबित केलंय, आम्हाला वर्ष वर्ष निलंबित करून त्यांनी मुघलशाही केली. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत आमदारांना रेडे म्हणतात. शिवसैनिकांना तिकीट दिलं,  त्यावेळी ते खरे शिवसैनिक होते. ज्या आमदारांना तुम्ही अठरा अठरा महिने भेटले नाही. ते तुम्हाला सोडून गेले, त्यांना तुम्ही रेडे म्हणतात. तुम्ही लोकांचा अपमान करता, तर जनता तुमचा अपमान करेल, अशा शब्दांत बावनकुळे यांनी संजय राउताना सुनावले. 


भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले की, सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात येऊन असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे बोलले आहे, ते माफ करण्यासारखे नाही. त्यांचं वय पाहून जो आदर होता, तोही निघून गेलाय. त्यांनी या पद्धतीने यापुढे बोलू नये. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रोशात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या हुकूमशाही आणि मोगलशाही याला कंटाळून बाहेर पडले. संपूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी न्याय दिला नाही. त्या आमदारांना वाटले की, हे सरकार कायम राहिले तर आम्ही निवडून येणार नाही, म्हणून ते बाहेर पडले, असल्याचा निर्वाळा बावनकुळे यांनी दिला.