Nashik Satyajit tambe : नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत निर्माण होत असून आज सत्यजीत तांबे  नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मतदारांसह काही शिक्षक आणि पदवीधरांच्या भेटी घेतल्या आहेत. तसेच ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहे. 


नाशिक (Nashik Padvidhar) पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच या निवडणुकीत अनेक घडामोडी घडत असल्याने नेमके कुणाचा कुणाला पाठिंबा याबाबत संभ्रम आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे, मात्र सत्यजीत तांबे कोणाच्या बाजूने आहेत? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळेच ते आज नाशिकमध्ये दाखल अनेक सकाळपासून त्यांनी नाशिक निवडणूक पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्याचबरोबर काही शिक्षक आणि पदवीधरांच्या भेटी घेत आहेत. अशातच सत्यजित तांबे यांना महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेचा पाठिंबा दिला असल्याचे समजते आहे. 


विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठीहोणार्‍या निवडणुकीत सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र सत्यजित तांबे नेमके कोणासोबत? याबाबत मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. कालच जळगाव येथील पदवीधर मतदाराने सत्यजित तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी फोन वरून केली. तर आता मतमदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा तोफा धडाडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे हे नाशिकमध्ये आले असून त्यांनी शहरातील विविध भागात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. तर विशेष म्हणजे तांबे यांना महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेचा पाठिंबा दिला असल्याचे समजते आहे. या संघटनेचे राज्यभरात शेकडो सदस्य असून जाहीर पाठिंबा देणारी पहिलीच संघटना असल्याचे बोलले जात आहे. 


महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेचा पाठिंबा
महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना यांनी तांबे यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रही त्यांनी तांबे यांना दिले आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सर्व पदवीधर मतदारांनी सत्यजित तांबे यांच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन ‘मस्ट’ या संघटनेने केले आहे. पदवीधरांना उच्चशिक्षित असलेल्या सत्यजित तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण दिसत आहे. त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे, असे मनीष गावंडे यांनी पत्रात म्हटले आहे. नाशिक विभागातील संघटनेचे पदाधिकारी, हितचिंतक आणि शिक्षक तांबे यांच्या विजयासाठी निष्ठेने काम करतील, असेही पात्रात म्हटले आहे.