CM Eknath Shinde : नाशिक (Nashik) शहरातील सारथी कार्यालयाचे (SARTHI) उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले असून यावेळी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) व संभाजीराजे छत्रपती (Sabhajiraje Chatrpati) हे देखील उपस्थित होते. सारथीच्या कार्यालयामुळे आता स्थानिक विद्यार्थ्यांना अभ्यासिका, वसतिगृहांची सुविधा मिळणार असल्याने विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 


छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथीचे विभागीय कार्यालय नाशिकरोड येथे उभारण्यात आले आहे. नाशिकच्या नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय परिसरात सारथीचे कार्यालय साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री दादा भुसे, संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हा उद्घाटन आज सकाळी करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सारथीचे कार्यालय नाशिकमध्ये व्हावे अशी मागणी होत होती. दरम्यान सारथीचे केंद्र नाशिकमध्ये व्हावे यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हेमंत गोडसे पाठपुरावा करत होते. या प्रयत्नानंतर अखेर सारथीचे कार्यालय नाशिकमध्ये आले.


संभाजीराजे छत्रपती यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुणे येथील सारथीच्या धर्तीवर नाशिकमध्ये सारथीचे कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विदयार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये वसतिगृह, अभ्यासिका त्याचबरॊबर इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना या सुविधा घेण्यासाठी पुणे येथे जावे लागायचे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक वर्षांपासून त्या त्या जिल्ह्यात सारथीचे कार्यालय असावे यासाठी पाठपुरावा केला होता. 


उदघाटन पत्रिकेवरून वाद 
नाशिकमध्ये (Nashik) होत असलेल्या सारथी कार्यालयाच्या (sarthi Office) उदघाटनावरून वादाला तोंड फुटले असून सारथीच्या उदघाटन कार्यक्रम पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrpati)  यांचे नावच नसल्याने मराठा संघटना (Maratha Organization) आक्रमक झाल्याच पाहायला मिळाले होते. सारथीच्या उद्घाटन पत्रिकेत संभाजीराजे छत्रपती यांना डावललं, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता. संभाजी महाराजांना डावलल्यास कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर (Karan Gaikar) यांनी दिला होता. मात्र आज झालेल्या सारथी कार्यालयाच्या उदघाटनासाठी संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित होते. त्यामुळे वादावर पडदा पडल्याचे दिसून आले. 


नाशिक शहरात विविध कार्यक्रम...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान सारथीच्या उदघाटनानंतर आता पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ तसेच नाशिक येथील गंजमाळ येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन तसेच कालिदास कालामंदिर येथे एका स्थानिक वृत्त वहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे आदी सहभागी होणार आहेत.