Nashik winter Session : नाशिकची (Nashik) तरुणाई ड्रग्स, गांजा, अफू आणि दारूच्या विळख्यात सापडली असून नाशिकच्या कुठल्याही कोपऱ्यात अमली पदार्थ सहज उपलब्ध होणे सामान्य बाब झाली असल्याची गंभीर बाब आ. देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी विधानसभेत मांडली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली. 


नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ (Drugs) विक्रीसह पार्लरच्या वाढल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता आमदार फरांदे यांनी थेट विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून कडक कारवाईची मागणी केली आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येत असून मागील काही दिवसांपूर्वी शहरातील पान टपरी, हॉटेल्स, गल्लोगल्ली अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते. या संदर्भातील मुद्दा जिल्हा नियोजन बैठकीतही उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात नाशिक येथील नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक शहरात अमली पदार्थांचे प्रकरण विधानसभेत उचलून धरले आहे. 


नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येत असून भिवंडी येथून नाशिक शहर व मालेगावसाठी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. तसेच नाशिक शहरात हुक्का पार्लर देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फरांद यांच्याकडून विधानसभेत करण्यात आली. अमली पदार्थांवर बोलतांना फरांदे म्हणाल्या की, शहरातील मखमलाबाद रस्त्यालगत व गंगापूररोडवर काही हॉटेल कॅफे हे अड्डे झालेले आहेत. शिवाय पान टपरीवर देखील अमली पदार्थ रात्री उशिरापर्यंत विकले जात असतात. याचबरोबर शाळेच्या परिसरात छुप्या पद्धतीने विक्री करण्याचे उघडकीस येत आहेत. त्यामुळे शाळांमधील मुले देखील अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. याबाबत यापूर्वी देखील पोलीस आयुक्तांना  निवेदन देण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे फरांदे यांनी नमूद केले. दरम्यान काही वेळात विधानसभा अध्यक्षांनी याबाबत कारवाई करावी असे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत.


नाशिक शहरात गुन्हेगारी (crime) दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिकाधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीतून लहान मुलांपर्यंत सेवन होत असल्याने साखळी वाढत चाललंय आहे. अशातच अमली पदार्थांच्या सेवनातून गुन्हेगारी कारवाया वाढत असून आत्तापर्यंत ड्रग्सच्या आहारी गेलेल्या तीन तरुणांनी आत्महत्या केल्याचा आरोपही फरांदे यांनी यावेळी केला. दरम्यान शहरात हे ड्रग्स कुठून येते? त्याचा पुरवठा कोण करतं? लोकप्रतिनिधी त्याची खबर कशी लावू शकत नाही? पोलीस यंत्रणा यावर काय उपाययोजना करत आहे? असे प्रश्न यावेळी उपस्थित केले.