Harihar Fort : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील हरिहरगड (Harihar Fort) येथे मालेगाव येथून पर्यटनासाठी (Tourism) आलेले चार जण उतरताना वाट चुकल्याने अंधारामुळे अडकल्याची घटना रात्री उशिरा घडली. दरम्यान वेळीच संपर्क झाल्याने वनरक्षक, वनमजूर बचाव पथकाने त्यांना रात्री उशिरा गडाखाली सुखरूप उतरवले. रात्रीच्या वेळी गडावर दाट धुके असल्याने हे पर्यटक अडकून पडले होते. मात्र यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच मध्यंतरी पर्यटनाला बंदी घातल्यानंतर पर्यटकांचा ओघ काम झाल्याचे चित्र होते. मात्र पुन्हा एकदा पर्यटकांनी (tourist) आपला मोर्चा त्र्यंबक परिसरातील पर्यटनस्थळांकडे वळविला आहे. याच पार्श्वभूमीवर मालेगाव (Malegaon) येथून पर्यटनासाठीं आलेल्या चार मित्रांना मात्र गडावरून उतरताना वाट सापडली नाही. वाट चुकल्याने ते भरकते. शेवटी स्थानिक तरुणाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर या चौघांना खाली आणण्यास मदत झाली. यासाठी वनविभाग आणि गिर्यारोहकांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवित वाट चुकलेल्याना सुखरूप खाली आणले. 


काही दिवसांपूर्वी दुगारवाडी (Dugarwadi) परिसरात अडकून पडल्याने दहा ते बारा जणांचा ग्रुपने प्रशासनाची कोंडी केली होती. रात्रभराच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित गटाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र यामध्ये गटातील एकाला आपला जीव गमवाव लागला. यानंतर प्रशासनानाने सतर्क होऊन त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटनस्थळांवर बंदी घातली. त्यानंतर पर्यटकांचा ओघ कमी झाला. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होताच आता पुन्हा पर्यटक गर्दी करू लागले आहेत. मालेगाव येथून फैजान अहमदुल्ला हिपदुला, शहेमूद युसुफ जमाल, सहजुद रहमान, मोहम्मद रफीक हे चारही जण हरिहरगड येथे पर्यटनासाठी आले होते. गड परिसरातील पर्यटनानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र ते वाट चुकल्याने भरकटले होते. अंधारामुळे ते अडकल्याने निरगुडपाडा हर्षवाडीतील तरुणाच्या ही बाब लक्षात आली. 


दरम्यान त्यानंतर स्थानिक तरुणांनी संपर्क साधत त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितले. रात्री दहा वाजेच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला हे पर्यटक अडकल्याची समजले. पथकाने ग्रामीण पोलीस त्र्यंबकेश्वर, वनविभागाचे पथक, आपत्ती व्यवस्थापन गिर्यारोहकांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.  दरम्यान तासाभराच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर चौघा पर्यटकांना सुखरूप पायथ्याशी आणले. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान हरिहर किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी या ठिकाणी मार्गदर्शनाचा अभाव दिसून आला. प्रांताधिकारी, तहसीलदार ,पोलीस खाते, वनविभाग यांचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी यांनी केलेले प्रयत्न सार्थकी ठरले.


पर्यटकांना मार्गदर्शनाचा अभाव !
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ला हा घनदाट जंगलामध्ये व चढण्यासाठी अत्यंत अवघड दुर्गम असा हा किल्ला आहे. जाऊन येऊन साधारण पाच तासाचा कालावधी लागत असतो. साधारण अडीच किलोमीटर कच्चा रस्ता, पायवाट व दोनशे दुर्गम पायऱ्या आहेत. त्यामुळे रात्री उशिरा पर्यटक जर किल्ल्यावर गेले, तर त्यांना परतीचा मार्ग सापडत नाही. त्यामुळे वन विभागाने सायंकाळी चार नंतर वरील ठिकाणी कोणीही जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सूचना फलक लावावे  पर्यटक हे नवखे असतात. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. दिशादर्शक फलक लावावा. या ठिकाणी असलेली चौकी कार्यरत ठेवता येईल, असे नियोजन करावे.