Nashik News : नाशिक (Nashik) शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Nashik Police commissioner) यांच्या आदेशान्वये पुढील 15 दिवस प्रतिबंधात्मक मनाई आदेश (Restrictive restraining order) देण्यात आले आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतेही कार्यक्रम घेता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. 


मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या पक्षांमध्ये सत्ता संघर्षांवरून (Maharashtra Politics) सुरु असलेले राजकरण, कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल, त्यानंतर राज्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवार 15 मेपासून ते सोमवार 29 मे पर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार राजकीय पक्ष, सामान्य नागरिकांना पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतेही आंदोलन व उपक्रम घेता येणार नसल्याचे या मनाई आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान नाशिक शहरात राजकीय पक्षासह सामाजिक संघटना व कामगार संघटनांकडून मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषण अन्य धार्मिक सण, यात्रा/ जत्रा इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशात कोठेही जातीय घटना घडल्यास त्याच्या प्रतिक्रिया शहरात उमटण्याची शक्यता असते. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तालय हद्दीसाठी आयुक्त शिंदे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी असून, सभा घेण्यास, मिरवणुकीसाठी पूर्व परवानगी लागणार आहे. शहरात विविध राजकीय पक्ष, संघटना, कामगार संघटना मागण्यांसाठी मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे, उपोषण व आंदोलने करतात. तसेच भाविक धार्मिक सण, यात्रा जत्रा करतात. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था विषयक आयुक्तालय कार्यक्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच परस्परविरोधी आरोप व प्रत्यारोप सुरू असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याठी पोलिस आयुक्तांनी मनाई आदेश लागू केले आहेत.


आदेशात कशाला प्रतिबंध? 


नाशिक शहरात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक मनाई आदेशानुसार 15 ते 29 मेदरम्यान कुणालाही दाहक पदार्थ किया स्फोटक पदार्थ, दगड, शस्त्रे, अस्त्रे, गावठी कट्टे, तलवारी, दांडे, काठ्या आणि अन्य प्राणघातक हत्यारे आणि वस्तू बाळगता येणार नाहीत. कुणाच्या प्रतीकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करता येणार नाही. सोबत अर्वाच्च घोषणा, आवेशपूर्ण भाषण करता येणार नाही. सोबतच वाय वाजवविण्यास मनाई करण्यात आली आहे. महाआरती, वाहनांवर झेंडे, पेढे वाटणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करण्यासह प्रतिबंधात्मक आदेशाच्या माध्यमातून पोलिस आयुक्तानी मनाई केली आहे.