Nashik Crime : दिंडोरी (dindori) तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील ढकांबे येथील एका बंगल्यात रात्रीच्या सुमारास टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील (Robbery) आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले. या प्रकरणी नाशिक (Nashik) शहरातील आणि मध्य प्रदेशातील सातपैकी चार संशयितांना अटक केली आहे. 


नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस हद्दीतील (Dindori Police) ढकांबे येथील शेतकरी रतन बोडके यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास संशयितांनी प्रवेश करुन बंदुकीचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने आणि 8 लाख 50 हजार रुपयांच्या रोख रक्कमसह एकूण 17 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरुन नेला होता. त्यावरुन दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार तपास सुरु असताना नाशिक इथून एका संशयिताला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून इतर संशयितांचा माग घेतल्यानंतर या दरोड्याची उकल झाली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर वस्तीवरील दरोड्याच्या घटनेनंतर तीन वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तपास सुरु असताना नाशिक शहरातील संशयित नौशाद आलम शेख यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने नाशिक शहर आणि मध्य प्रदेश राज्यातील साथीदारांसह कार आणि दुचाकीवर दिंडोरी रोडने मानोरी परिसरात जाऊन एका अलिशान बंगल्यात दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली.


चोरुन नेलेल्या दागिन्यांपैकी 16 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत


या प्रकरणातील रेहमान फजल शेख, इरशाद नईम शेख, लखन लाल कुंडलिया, रवि उर्फ लालू, देवीलाल फुलेरी, इकबाल खान फारुन खान, भुरा उर्फ पवन स्तन फुलेरी या सर्वांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून दरोड्याच्या गुन्ह्यात चोरुन नेलेल्या दागिन्यांपैकी 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा जवळपास 4 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या संशयितांविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील धुळे, औरंगाबाद, पुणे, नाशिक जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेश राज्यात दरोडा, जबरीचोरी आणि चोरी यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. 


अशी घडली होती घटना.. 


नाशिक शहरापासून दिंडोरी तालुक्याच्या हद्दीत असलेल्या वणी रस्त्यावर ढकांबे गाव आहे. येथील बोडके वस्तीवर ही घटना घडली होती. येथील शेतकरी रतन शिवाजी बोडके राहत असलेल्या "शिवकमल" बंगल्यामध्ये पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी प्रवेश रात्रीच्या सुमारास कुटुंब गाढ झोपेत असताना बंदुकीचा धाक दाखवत घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे घराबाहेर असलेल्या पाळीव कुत्र्याला दरोडेखोरांनी गुंगीचे औषध देत घरात प्रवेश केला. त्यांनतर बंदुकीचा धाक दाखवून बोडके कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील सोने, पैसे घेऊन पसार झाले होते.