Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील जेलरोड भागातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलला कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तरी देखील ही शाळा अनधिकृतपणे चालवून शासनाची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी तिरुपती एज्युकेशन ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाशिक शहरातील जेलरोड भागात तिरुपती एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल (Emerald School) असून या शाळेच्या बाबतीत अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे (Education) दाखल झाल्या होत्या. त्याशिवाय एक गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळेची मान्यताच रद्द केलेली होती. मात्र तरी देखील शाळा सुरूच होती. शिवाय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची मान्यता न घेताच अनधिकृतपणे शाळा चालवून आरटीई 2009 अधिनियम कलम 18 (5) भंग करण्यासह शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी जेलरोड भागातील तिरुपती एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल या शाळेच्या व्यवस्थापना विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षण विभागाकडून राज्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश होते. त्यानुसार नाशिकरोड भागातील एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची आणि सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम असलेली शाळा विनापरवानगी सुरू असल्याचे पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. ही शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश पालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेले होते. मात्र तरीही ती सुरूच राहिल्याने पालिका शिक्षण मंडळाने अखेर शाळा प्रशासनाला आर्थिक दंड ठोठावला होता. त्यानंतर ही शाळा व्यवस्थापनाने शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या या आदेशाला केराची टोपी दाखवली. वारंवार सूचना देऊनही शाळा सुरूच राहिल्याने अखेर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आणि अनधिकृत शाळा चालवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मनपा शिक्षण विभागाच्या वतीने प्रभारी केंद्रप्रमुख गोपाल बैरागी यांनी या शाळेच्या विरोधात फिर्याद दाखल केली. 


शासनाची फसवणूक केल्याचा ठपका 


दरम्यान काही दिवसांपूर्वी या शाळेच्या विद्यार्थ्यास अमानुष मारहाण प्रकरणात समोर आली होती. तत्कालीन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पालिकेच्या शिक्षण मंडळाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांना हाइट्स पब्लिक स्कूल या शाळेची चौकशी करून शाळा मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याच्या आदेश दिले होते. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनाही शिक्षण उपसंचालकांनी या शाळेची चौकशी करून मान्यता काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. 


शहरात तीन अनधिकृत शाळा 


शिक्षण विभागाने राज्यभरातील 674 शाळा अनधिकृत ठरविलेल्या आहेत. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील तीन शाळांचा समावेश असून त्यांना नऊ कोटींचा दंड ठोठावला आहे. नाशिक शहरातील जेलरोड येथील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कुल, सातपूर येथील वंशराजीदेवी हिंदी मिडीयम स्कुल आणि वडाळा येथील खैरुत बनात इंग्लिश मिडीयम स्कुल या शाळांचा समावेश आहे.