Chhagan Bhujbal : '1991 पासून अनेक मंत्रिपदे सांभाळत आलो आहे, सुरवातीला महसूल, नंतर हौसिंग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अशी घौडदौड सुरूच आहे. त्यामुळे जे खात मिळालं, त्यातून लोकांची सेवा करण्याबरोबर विकास करता येईल', अशी पहिली प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी खातेवाटपावर दिली आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून नव्या मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Expansion) खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला असून राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली आहेत. त्यानुसार अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अखेर अर्थ खाते मिळालं असून धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सर्वांच्या नजर लागलेल्या छगन भुजबळांकडे (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते सोपवण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांच्याकडे हेच खाते होते. मंत्री छगन भुजबळ आज येवला (Yeola) मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून आज सकाळपासूनच खातेवाटपाबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर दुपारी या सर्व खात्यांचे वाटप झाले असून त्यात छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पद देण्यात आले आहे. 


येवला दौऱ्यावर असलेले छगन भुजबळ या खातेवाटपावर म्हणाले की, 'कोरोना काळात सर्व बंद असताना 54 हजार दुकानांतून राज्यात अन्न धान्य पुरवलं. सर्व बंद असताना रेशन दुकाने चालू होती. गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरु झाल्या. ते खाते मिळाल्याने आनंदच आहे, सर्वांचं पोट भरणार खात आहे. यावेळी देखील चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. मंत्री एका घटकाचे नसतात. त्यामुळे कोणत्याही खात्यातून विकास साधला जातो. आता शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडविण्यास मदत होईल. पुन्हा एकदा विकास सुरु होण्यास मदत मिळेल. दरम्यान या खातेवाटपात बदल करण्यात आल्याने पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून बंदरे खनिकर्म हे पद पढून आता सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली आहे. यावर भुजबळ म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, नाशिक जिल्ह्यात चांगली कामे करण्यासाठी त्यांची मदत होईल, असे ते म्हणाले. 


 


13 दिवसांनी खातेवाटप जाहीर


राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्याचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुमारे 13 दिवसांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ पदभार ठेवण्यात आलेला आहे. कृषी खाते धनंजय मुंडे यांना तर अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर खाते वाटप जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटातील 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक दिवसांपासून खातेवाटपाबाबत घडामोडींना वेग आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वारंवार बैठका सुरू होत्या. अखेर आज खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी घेऊन राज्यपालांकडे पोहचले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Maharashtra Cabinet : भाजपची 6 तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला; कोणाची खाती पवारांच्या गटाकडे?