Nashik News : रात्रंदिवस मेहनत करून, पोटाला चिमटा मारून, शेती करून पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहे. राज्यभरात मागील काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. आता हे लोन गावागावात पोहचले आहे. अशातच देवळा (Deola) तालुक्यातील माळवाडी (Malwadi Village) येथील ग्रामस्थांनी सरकारच्या धोरणाला निषेधार्थ ‘ गाव विकणे आहे’, असा बोर्ड ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावला. गाव विक्री काढलेल्या या ग्रामस्थांनी राज्य सरकारला गाव विकत घेण्याचे आवाहन केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून कांदा दरातील घसरण, सरकारचे शेतकरी (Farmers) विरोधी धोरण शिवाय गेल्या अनेक वर्षात शेती मालाला मिळत नसलेला भाव यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. शिवाय दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावाने थेट गाव विक्रीला काढले आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून शेती मालाला भाव मिळत नसल्याने गावातील शेतकरी चांगलेच वैतागून गेले आहेत. त्यामुळे गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत गाव विक्रीसंदर्भात ठरावच केला असून  शासनाकडे गाव विकण्याबाबतचा ठराव पाठविण्यात येणार आहे. गावकऱ्यांच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे जिल्ह्यात माळवाडी गावाची जोरदार चर्चा सुरू आहे.


नाशिकच्या (Nashik District) देवळा तालुक्यातील ग्रामस्थांची सरकारकडे गाव विकत घेण्याची मागणी केली आहे. आत्महत्या करण्यापेक्षा जमीन विकून सुखी जीवन जगता येईल अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. माळवाडी गाव हे हजार दोन हजार लोकवस्तीचं गाव. येथील गावकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. जवळपास 534 हेक्टरवर शेती व्यवसाय करत आहेत. यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जात आहे. मात्र गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला भाव मिळत नसल्यानं ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. त्यामुळे थेट ठराव एकमताने केला असून गाव विक्रीला काढले आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 


गावकऱ्यांचं म्हणणं काय? 


गावकऱ्यांचं म्हणणं काय तर? रोजच्या जगण्यासाठी लागण्याऱ्या वस्तू, मुलांची शाळा, कुटुंब चालविणे अवघड झाले आहे. शेती करून काहीच भागत नाही. अनेक वर्षांपासून शेती करत असून पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने लागवड, उत्पादन खर्चही सुटेनासा होत आहे. बँकांचे कर्ज, सावकारांचे कर्ज फिटेनासे झाले आहे. वावर गहाण ठेवून शेती केली जात आहे. मात्र उत्पन्न शून्य असल्याने आता पर्याय उपलब्ध नसल्याने संपूर्ण माळवाडी गाव विकण्याचा ठराव गावात सभा घेऊन पास केला आहे. संपूर्ण गावकरीच गाव विकण्याच्या मनस्थितीत आले आहेत. शेतीवर आधारित असलेल्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्जफेड करण्याइतपत उत्पन्न मिळावे, सरकारने दखल घ्यावी शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे. ते सरकारनेच विकत घ्यावे अशी मागणी देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.


गाव विकण्याचाच पर्याय 


गेल्या पाच वर्षांपासून शेती मालाला भाव नाही, अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान होत आहे. याबरोबरच शेतकरी धोरण राबविताना शेतकऱ्यांच्या धोरणांचा विचारच होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. म्हणून गावात राहून खितपत पडण्यापेक्षा गाव विकून बाहेर कुठेतरी निघून जावे, यासाठी आम्ही गाव विकण्यासाठी काढले आहे. सरकारने शेतकऱ्याना न्याय द्यावा, अशी वेळ कुणावरही येऊ नये, म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी निदान पिकाला योग्य भाव देण्याचे नियोजन करावे, अन्यथा गाव विकण्याचाच पर्याय असल्याचे गावकरी सांगतात.