Nashik Leopard : नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याचा वावर (Leopard) वाढतच असून देवळाली कॅम्प परिसरातील लहवित येथे बिबट्याची पाच वर्षाची मादी जेरबंद झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर गंगापूर (Gangapur) जवळील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आवारात कुलगुरू निवासस्थानाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्यांचा संचार आढळून आला आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. अशातच शहराजवळील वंजारवाडी परिसरात बिबट्याचा गत पंधरा दिवसांपासून धुमाकूळ असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. या परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागाला प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावला होता. रविवारी रात्री लहवित येथील राजाराम पाळदे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट मादी जेरबंद झाली आहे. 


दरम्यान मादी जेरबंद झाल्यानंतर डरकाळी फोडू लागल्याने स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर पाळदे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत बिबट्यास ताब्यात घेत त्यास गंगापूर येथील रोपवाटिकेत ठेवले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. 


'मुक्त'मध्येही बिबट्याचा मुक्त संचार 
नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. आता गंगापूर जवळील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आवारात कुलगुरू निवासस्थानाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्यांचा संचार आढळून आला आहे. या बिबट्याने परिसरातील कुत्र्याचे पिल्लू पळवले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून कुलगुरू डॉ प्रशांत कुमार पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सावधानतेचे आवाहन केले आहे. 


ताराच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू 
ओझरच्या मोहाडी व साकोरे मिग यांच्या सीमेवर एचएल कंपनीच्या रडार क्रमांक तीन लगतच्या संरक्षण भिंतीच्या भगदाडातील कुंपणात 23 ऑगस्ट रोजी बिबट्या अडकला. त्याला सकाळी 11 वाजता सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. कुंपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याचे शरीरावर जखमा झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे