Nashik Mahavitaran : महावितरणच्या (Mahavitaran) कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर नाशिक (Nashik) शहर परिसरातील शेतकऱ्यांना संपाचा फटका बसत असून काल रात्रीपासून काही गावे अंधारात आहेत. अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर शहरात मात्र अद्याप वीज पुरवठा सुरळीत आहे. 


खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे (Mahavitaran) कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागात वीज पुरवठा (Power Supply) बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच नाशिकच्या अनेक ग्रामीण भागामध्ये वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याचा परिणाम हा बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा हा खंडित झाला असून नाशिक मधील मूंगसरे, दरी या सोबतच अनेक गावांना रात्रीपासून वीस पुरवठा खंडित झाला असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. 


नाशिक शहर परिसरातील दुगाव, मुंगसरा, दरी, मातोरी, धागुर, चांदशी भागात मध्यरात्रीपासून लाईट नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आज सकाळी या गावातील शेतकऱ्यांनी सबस्टेशन गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र सद्यस्थितीत कर्मचारी संपावर असल्याने खासगी कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम सुरु आहे. काल रात्रीपासून या परिसरात लाईट गेली असून मात्र अद्यापही लाईट आलेली नसल्याने कांदा लागवड खोळंबली आहे. शिवाय शेती कामासाठी आणलेले मजूर देखील खोळंबले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. संपावर गेलेल्या कमर्चाऱ्यांची राज्य सरकारने दखल घ्यावी, तेव्हा कर्मचारी रुजू होतील, तेव्हाच आमच्या अडचणी सुटतील. कांदा, गहू, द्राक्ष पिकाला पाणी द्यायचे असल्याने लवकरात सरकारने निर्णय घेऊन वीजपुरवठा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी म्हणाले, हा संप योग्य नाही, संपन्न कोणताही असो तो शेतकऱ्यांच्या मुळावरच असतो. वीज कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, मध्यम मार्ग काढावा,  राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, हा प्रश्न सोडवून वीज सुरळीत करून शेतकऱ्यांना मोकळं करा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 


खासगी कर्मचारी कार्यरत 


तर महावितरणचे कमर्चारी संपावर गेल्यानंतर काही खासगी ठेकेदाराकडून खासगी कर्मचारी कार्यरत करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्याकडून सध्या वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. संप काळामध्ये जे कर्मचारी संपावर गेलेले आहेत, त्यामुळे वीज यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी खासगी कर्मचाऱ्यांना पहिल्यापासून टेंडर दिलेलं आहे.  युद्धपातळीवर यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी सध्या नाशिक विभागात आठ दहा ठेकेदार असून शंभर ते दीडशे लोक कार्यरत आहेत. ते सद्यस्थितीत वीज पुरवठा सुरळीत कर्णयचे काम करत आहेत. अनेक ठिकाणाहून कॉल येत आहेत, त्याप्रमाणे काम सुरु असून वीज पुरवठा सुरळीत करत असल्याची माहिती एका खासगी कर्मचाऱ्याने दिली.