MLA Suhas Kande : नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत, नांदगाव विधान सभा मतदार संघाचा विकास महत्वाचा आहे, यासाठी शिंदे गटात सामील झाल्याचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले बंडखोर आमदार सुहास कांदे अखेर कॅमेऱ्यासमोर आले आहेत. कांदे यांनी एका व्हिडिओद्वारे शिंदे यांच्या सोबत का आलो याचे स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलाच ढवळून निघाल आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांना सोबत घेत गुवाहाटी गाठले. यामध्ये पहिल्या फलित नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे आमदार सुहास कांदे हे देखील सामील होते. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. शिवाय शिवसैनिक आक्रमक झाल्याने कांदे यांचे कार्यालय, घर आदी ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला असल्याने अखेर आमदार सुहास कांदे यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन आपले म्हणणे मांडले आहे.
गुवाहाटी येथून सुहास कांदे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते म्हणतात कि, 'माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये अशी विनंती त्यांनी व्हिडिओतून केली आहे.
काय म्हणालेत व्हिडिओतून...!
जय महाराष्ट्र, मी आमदार सुभाष कांदे आदरणीय हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा आणि आदरणीय आनंदजी दिघे यांची विचारधारा घेऊन आमचे नेते शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहे.
आणि शिंदे साहेब आमचे नेते आहेत आम्ही जे काही गुवाहाटीला आलेलो आहोत हे आमच्या स्वच्छेने आणि माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आलेलो आहे. यामध्ये करंजवण योजना असेल, 78 खेडी योजना, गिरणा नांदगाव योजना असेल, या योजना जर आपल्याला मार्गी लावायचे असेल तर त्या सगळ्यांना शिंदे साहेबांबरोबर हिंदुत्वाचे विचार जर आपल्याला पुढे न्यायचे असेल तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन पुढे जायचे असेल तर त्यामुळे गुवाहाटीला नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आलो.
आणि आमच्यावर कोणाचाही प्रेशर नाही, कोणाचाही दबाव नाही, आम्ही इथे सर्व हसत खेळत राहत आहोत. आणि कोणत्याही नेत्याच्या, शिवसेनाच नव्हे तर इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात नाही. आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत आणि मरेपर्यंत हिंदुत्वासाठी आणि नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी शिंदे साहेबांसोबत राहू.
जय हिंद जय महाराष्ट्र!