Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस (rain) सुरू असताना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा शेती पिकांना बसत आहे. इगतपुरीसह (Igatpuri) त्र्यंबकेश्वर, सुरगाणा (Surgana), सिन्नर (Sinnar), येवला परिसरात परतीच्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून थैमान घातले असून तालुक्याच्या अनेक भागातील भात शेती (Crop Damage) धोक्यात आली आहे. त्याचबरोबर टोमॅटो लागवडीवरही संकट उभे ठाकले आहे. 


मागील तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात (Nashik District) धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वाधिक क्षेत्र असलेली भात शेती संकटात सापडली आहे. मागील वर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उसनवारीवर दुबार पेरणी करून भात पिकांची (Rice Crop) लागवड केली होती. यावर्षी पावसाचे प्रमाण हे अधिक राहिले आहे. तसेच मागील दोन ते तीन दिवसात जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भात पिकांसह बागायती शेती धोक्यात आली आहे. तीन दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या परतीच्या पावसामुळे भात पिकांसह टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे


सिन्नर तालुक्यातही (Sinnar) मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून पिकांच्या नुकसानी सह शेतामधील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. दोन दिवसांपासून सिन्नर शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे प्रमाण नुकसान झाले आहे. अनेक भागातील शेतामधील पिके वाहून गेली असून शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पिके हातात येण्याची शक्यता मावळली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या प्रवाहाला इतका जोर होता की काही ठिकाणी शेतांमधील जमीन अक्षरशः खरवडून निघाली. तसेच सरस्वती नदीला दुसऱ्यांदा पूर आल्याने नदीकाठच्या घरांना पुराचा वेढा पाहायला मिळाला. 


भात शेतीसह टोमॅटो शेती पाण्यात 
पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी यामुळं दुबार-तिबार पेरणीनं आधीच शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसाचा पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भट शेती केली जाते. काही भागात भात काढणीला आला असताना परतीच्या पावसानं भात पाण्यात गेली आहे. गेल्या तीन दिवसापासून जिल्हाभरात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची भात, टोमॅटो आदींसह इतर शेती पाण्यात गेल्याने पावसाच्या या उच्छादामुळं ही पिके होत्याची नव्हती झाली आहेत.