Nashik Dada Bhuse : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे की, मला एक तास जरी पंतप्रधान केले तर मी राम मंदिर (Ram Mandir) बांधेन, त्याचबरोबर कलम 370 हटवेन. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या विचारांची किव करावीशी वाटते, अशी खंत पालकमत्री दादा भुसे यांनी बोलून दाखवली आहे. 


आज मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे नाशिकमध्ये (Nashik) असून सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर असून यावर आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, आता कलयुग आहे आणि रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत." यावर दादा भुसे यांनी रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, मला एक तास जरी पंतप्रधान केले. तर मी राम मंदिर बांधणार आणि कलम 370 हटवणार असल्याचे बोलले होते. अयोध्या येथील राम मंदिर संपूर्ण जगाला हेवा वाटेल असं आहे. प्रत्येकाला वाटतं की, आपण राम जन्मभूमीचे दर्शन घ्यावे. शिवाय शिंदे भाजप सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या इच्छा होत्या, त्या पूर्ण झाल्या आहे. एक शिवसैनिक म्हणून वाटतं की, या सरकारने सगळे चांगले निर्णय घेतले आहेत." मात्र सद्यस्थितीत विरोधकांच्या हातात काही शिल्लक राहत नसल्याने वैफल्यग्रस्त भावनेतून हे आरोप होत असल्याचे भुसे म्हणाले. 


दरम्यान दादा भुसे यांनी नाशिकच्या पाणी कपातीवर महत्वाचे आवाहन केले आहे. भुसे म्हणाले की, "नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी, गुरांसाठी चारा, तसेच लोकांच्या हातासाठी काम मिळवून देणे यासंदर्भात बैठक झाली. गाव पातळीवर पाण्याचं नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. चालू वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन होईल. शिवाय पाणी कपात होणार नाही, पण पाण्याची बचत करावी. पाण्याचा अपव्यय होऊ नये, म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तर नाशिक शहरासाठी पाणी कपातीचा फक्त प्रस्ताव आहे, अद्याप निर्णय नसल्याचे भुसे म्हणाले. 


'ती' गोष्ट दीपक केसरकरांना माहित....  


तसेच दीपक केसरकर यांनी वक्तव्य केलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची माफी मागावी आणि शिवसेना भाजपा पुन्हा एकत्र येईल. यावर भुसे म्हणाले की, "नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संवाद करण्याचे काम दीपक केसरकर करत होते, अशी माहिती त्यांनी खाजगीत दिली होती. त्यामुळे त्यांच्याकडे काही माहिती असेल," असे भुसे म्हणाले. तर सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे येथे काल महाप्रसादातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. यावर भुसे म्हणाले की, ठाणगाव बाऱ्हे येथे काल्याचे कीर्तन होते. कीर्तनाचा प्रसाद घेतल्याने काही लोकांना त्रास झाला. यातील काही जण बरे होऊन घरी देखील गेले आहेत." तसेच नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यावर भुसे म्हणाले की, सद्यस्थितीत 86 कोरोना रुग्ण असून फक्त दोन रुग्ण दवाखान्यात आहेत."