Nashik Chhagan Bhujbal : जर अजित पवार (Ajit Pawar) यांचं चुकीचं असतं, तर विधानसभेत त्याचवेळी त्यांना सांगायला हवं होतं की, हे रेकॉर्डवर चुकीचं जात आहे. मात्र हे आता थांबायला हवं. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांचा अपमान केला नसल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नाशिकमध्ये (Nashik) असून त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर चर्चा केली. ते यावेळी म्हणाले, काही दिवसांपासून अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून चागंलेच रान पेटले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणायचं कि स्वराज्यरक्षक म्हणायचं या प्रश्नावरूनच एकमेकांमध्ये चिखलफेक सुरु आहे. अशातच अजित पवार यांच्या वक्तव्यावरून जे राजकारण सुरु आहे, ते आता थांबायला हवं. अजित पवार यांनी संभाजी राजे यांचा अपमान केला नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांना कमी लेखण्याचे काम केले, पण अजित पवारांनी तसं केलं नाही. संभाजीराजे यांनी स्वराज्याचे रक्षण केलं, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं. पण कुणाला धर्मवीर म्हणायचं असेल, तर म्हणू शकता. भाजपच्या नेत्यांची वक्तव्यं यावर पांघरूण घालण्यासाठी हा वाद सुरू आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून एवढे राजकारण तापवले जात आहे.
छगन भुजबळ पुढे म्हणाले, जर अजित पवार यांचं चुकीचं असतं, तर विधान सभेत त्याचवेळी त्यांना सांगायला हवं होतं की, हे रेकॉर्डवर चुकीचं जात आहे. त्यावेळी एका वर्गाने शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. मग शिवाजी महाराज आमचे प्रतिपालक नाही का? ते फक्त त्यांचेच प्रतिपालक आहे का? आजच्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी बाजूला सारून बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यावर विचार करायला हवा, असा सल्ला त्यांनी सत्ताधारी आणि भाजप नेत्यांना दिला आहे. शिवाय इतिहासात नाव कोरलेली ही सर्वच आपली दैवतं आहे. कुणी धर्मवीर म्हणा, तर कुणी स्वराज्य रक्षक म्हणा काही फरक पडत नसल्याचे ते म्हणाले.
भुजबळ वंचित आणि सेना युतीवर म्हणाले...
ज्या ज्या वेळी निवडणुका येतात, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की एकत्र यावं. आजच्या घडीला कुणी प्रकाश आंबेडकर यांना घेतलं, कुणी कवाडे यांना घेतलं, कुणी आठवले यांना घेतलं. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटांनी एकत्र यावं, पण सध्या ते शक्य वाटत नाही. प्रकाश आंबडेकर शिवसेना ठाकरे गटाशी युती करत आहेत. आमचा वंचित बहुजन आघाडीला विरोध नाही, अनेक पक्ष एकमेकांवर टीका करतात, मात्र निवडणुकीवेळी एकत्र येतात. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र', याप्रमाणे निवडणुकीवेळी एकत्र येतात त्यामुळे वंचितचे शिवसेना ठाकरे गटाशी युती झाली, यामध्ये काही वावगं नाही.
जाणता राजा ही पदवी मान्य....
जाणता राजा ही पदवी मान्य असून शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षांपासून फिरतो आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं. महिलांचे प्रश्न असतील, विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा, असे ते म्हणाले. तसेच शिवाजी महाराज यांचा इतिहास खूप मोठा आहे, मात्र एक एक दोन दोन पानांमध्ये मुलांना इतिहास समजतो का? चौथी पासून सातवी पर्यंत एक एक धडा अभ्यासक्रमात टाकायला हवा, पण काही वेळा इतिहास गाळला जातो. या विषयावर इतिहासकार, लेखक यांनी नेमकं मार्गदर्शन करावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.