Nashik Bogus Seed : नाशिक (Nashik) जिल्ह्यात बनावट कीटकनाशक (Fake pesticides) आणि तण नाशकांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली असून 17 पथकांद्वारे कृषी सेवा केंद्राची (Agricultural Service Centre) तपासणी करण्यात येत आहे. या पथकांनी जवळपास 211 कीटकनाशकांचे नमुने घेतले असून त्यातील 7 नमुने प्रयोगशाळेत तपासणीत अप्रमाणित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर ही बाब निदर्शनास आल्यानंतर या कंपन्यांनीही उत्पादने विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, रब्बी पिकांची लागवड करण्यात येते. यासाठी खतांसह बी बियाणे, कीटकनाशके आदींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र अलीकडे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्राचा सुळसुळाट झाला असून या मध्यमातून बोगस शेती संबंधित वस्तूंची विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कृषी विक्रेत्यांनी अप्रमाणित किटकनाशके, बियाणे, खते यांची विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील 17 भरारी पथकातील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांमार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांनी मेसर्स भरती मिनरल्स सिकंदराबाद, उत्तरप्रदेश व मेसर्स भांगर पेस्टीसाईड्स चंदीगड, पंजाब यांनी उत्पादित केलेले तणनाशक अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे.
तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अभिजित घुमरे यांनी मे जीएनपी ऍग्रो सायन्सेस ली. नाशिक या कंपनीने उत्पादित केलेले किटकनाशक अप्रमाणित आले आहे. सुपर फोर्ड इनसेकटी साईड्स , सिकंदराबाद, कॉनग्रेट्स ऍग्रो पॅक दिल्ली, आयचीबॅन क्रॉप सायन्सेस ली, राजस्थान या सर्व उत्पादकांना संबंधित बॅचची औषधें विकण्यास बंदी घाकण्यात आली आहेत. इतर कोणत्याही कृषी केंद्र चालकाने बंदी घातलेल्या बॅच नंबरचे किटकनाशक विक्री करू नये. तसे आढळल्यास किटकनाशक कायदा 1968 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
खतांच्या विक्रीसही बंदी
गुजरातमधील भरुच येथील मे आर व्ही ग्लोबल प्रा. या कंपनीने उत्पादित केलेले सिंगल सुपर फॉस्फेट पावडर या खतांच्या जुलै महिन्यातील बॅचचा नमुना खतनियंत्रण प्रयोगशाळेत अप्रमाणित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील काही भागात या बॅचचे खाते विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. संबंधित दुकानदारांना देखील याबाबत सजग करण्यात आले आहे. यामुळे या खतांच्या विक्रीसही बंदी घालण्यात आली आहे. मेसर्स रामा कृषी ली. पुणे या कंपणीचेही खत अप्रमाणित करण्यात आल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कारवाईचे आदेश
गेल्या काही वर्षात बोगस बियाणांची, खतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होतोच, शिवाय जमिनीची देखील झीज होते आहे. त्यामुळे संबंधितांवर ठोस कारवाईसाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 17 भरारी पथके कृषी सेवा केंद्राची तपासणी करून बोगस कीटकनाशकांचा शोध घेण्याचे काम करीत आहेत. बोगस कीटकनाशके आढळून आल्यास कठोर कारवाईचे आदेश विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिले आहेत.