Nashik Graduate Constituency  : एकीकडे नाशिक (Nashik Graduate Constituency) पदवीधर मतदारसंघात निवडणूक चुरशीची होत असताना भाजपने (BJP) अद्याप कोणत्याच उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. अशातच भाजप सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. मात्र दुसरीकडे तांबे विरोधात नंदुरबारमध्ये (Nandurbar) तीव्र निदर्शने करण्यात आली. मोदींच्या फोटोला काळं फासणाऱ्यास आम्ही मतदान करणार नाही, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पोस्टरला महागाई विरोधाच्या आंदोलनात काळे फसले होते. ज्या उमेदवाराला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या नागरिकाचा सन्मान करता येत नाही. त्याला भाजपाने पाठिंबा देऊ नये आणि पक्षाने पाठिंबा दिला तरी सुज्ञ नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते अशा उमेदवाराला मतदान करणार नाहीत, असा इशारा नंदुरबारमधील भाजप पदाधिकारी लक्ष्मण माळी यांनी दिला आहे. 


लक्ष्मण माळी (Laxman Mali) यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण मतदारांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विरोधात निदर्शने केली असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्यजित तांबे हाय हाय, सत्यजीत तांबे हाय हाय' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या हातात सत्यजित तांबे पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासत असलेले बॅनर होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळं फासणाऱ्या सत्यजित तांबेना आपण मतदान करणार का? असे नमूद करण्यात आले आहे. एकूणच पदवीधर मतदारसंघाचा प्रचार संपायला आता दोन दिवसांचा अवधी उरला असला तरी भाजप आतून सत्यजित तांबेना होणारा विरोध तीव्र झाला असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्ते पक्षाने आदेश दिला तरी त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असा संदेश या आंदोलनातून भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.


भाजपच्या आदेशाला जुमानणार नाही


यावेळी भाजप पदाधिकारी लक्ष्मण माळी म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक लागलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा असा अधिकृत उमेदवार नाही. किंवा कोणत्याही उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देखील देण्यात आलेला नाही. ज्या माणसाने मोदी यांच्या फोटोला शाही फेकून काळे फासलं होतं, अशा माणसांना भारतीय जनता पार्टीचा जो मूळ कार्यकर्ता आहे, जो सुज्ञ नागरिक आहे, तो मतदान करेल का? कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. जर कोणी पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्या आदेशाला जुमानणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळं फासणाऱ्याचा निषेध करत राहू. मतदान कोणाला करा हे आम्ही कोणाला सांगणार नाही, परंतु ज्या माणसाने मोदी यांचा अपमान केलेला आहे. त्या माणसाला कधीही मतदान करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.