Nashik Graduate Constituency: नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) चित्र रात्रीतून बदलण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं वक्तव्य भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दर्शविलेला नाही. या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) आणि शुभांगी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 


याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे योग्य वेळी पक्षाचा निर्णय देतील. निवडणूक जवळ आली असली तरी एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेमध्ये आहे. ज्या माणसाचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि रात्रीतून चित्र बदलून टाकू. अशी क्षमता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे याची अनुभूती सगळ्या जिल्ह्याला येईल. 


संगमनेर सोडून जिल्ह्यात काँग्रेस कुठेच जिवंत नव्हती


जिल्ह्यात काँग्रेसमध्ये कुणी नव्हतंच, त्यामुळे कुणी राजीनामा दिल्याने काँग्रेस मोकळी होत नाही. संगमनेर सोडून जिल्ह्यात काँग्रेस कुठेच जिवंत नव्हती असा टोला भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावला. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अवस्थता आहे, जिल्हाधक्षांनी राजीनामा दिला आहे. याबाबत खासदार सुजय विखेंना विचारले असता त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. राहुल गांधी जेवढा भारत जोडोचा प्रयत्न करतील तेवढीच काँग्रेस छोडो सुरू राहील असं खासदार विखे म्हणाले.


पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटील यांनी ही शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की,  प्रदेशाध्यक्ष असूनसुद्धा जयंत पाटील असं म्हणत आहेत याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. त्यांना दुःख हे नाही की अजित पवार तेव्हा का नाही गेले. त्यामुळे त्यांना काय फार आपण मनावर घेऊ नये. 


प्रत्येक पिढी दर पिढी कुस्तीची  प्रथा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रीगोंदा येथे सुरू असलेल्या कुस्तीत महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळतोय. त्यामुळे ही एक नवीन परंपरा या ठिकाणी जपली जात आहे. श्रीगोंदा येथे या कुस्ती होत असल्याने आनंद होत असल्याचं खासदार विखे म्हणाले.