Nashik Election : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Padvidhar) अद्यापही भाजपचा (BJP उमेदवार जाहीर झाला नसून दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार ठरला असूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब होत आहे. नाशिक या मतदारसंघात भाजपकडून अनपेक्षित उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. दरम्यान 5 व 6 जानेवारी, 2023 पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. त्यामुळे उमेदवार शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार अद्याप ठरला नसल्याने नेमका नाशिकच्या निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावर भाजप आमदार राम शिंदे म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करत असताना त्याच्यावर विचार विनिमय सुरु आहे. आमच्यासमोर अनेक नाव आहेत, त्यापैकी वेगवेगळी मतमतांतर समोर येत असल्याकारणाने विलंब होत आहे... पाच जिल्ह्याचा व्याप असल्यामुळे आणि ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्व त्याच्यावर चर्चा करत आहे. 


नाशिक पदवीधर मतदारसंघातील भाजपचा उमेदवार अद्याप ठरला नाही. यासंबंधी प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे.  त्यामुळे निर्णय व्हायला वेळ लागत आहे, मात्र पक्षाने ही जागा काहीही करून जिंकायचे ठरवले असल्याने योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. आज उद्या उमेदवार दिला जाऊ शकतो. जे काय आहे ते लवकरच कळेल.आज किंवा उद्या भाजपचा नाशिक पदवीधर मतदार संघाचा उमेदवार जाहीर होईल. आमच्याकडे राजेंद्र विखे , मीनाक्षी  पाटील , धनंजय विसपुते ही नावं आहेत. यापेक्षाही वेगळ काहीतरी नाव येऊ शकते. तसेच भाजपकडून काँग्रेसचे तरुण नेते सत्यजित तांबे यांना देखील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 


दरम्यान विधान परिषदेच्या 30 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी पाच पैकी तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार भाजपने कोकण शिक्षक मतदारसंघातून मुख्याध्यापक संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून किरण पाटील आणि अमरावती पदवीधर मधून माजी राज्यमंत्री रणजीत पाटील यांना आधीच उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारचे नाव 11 जानेवारीपर्यंत निश्चित केले जाईल. तर नागपूर शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल. 


भाजपचा उमेदवार निश्चित नाही... 


काही दिवसांपूर्वी तांबे यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यावरूनही चर्चा सुरू झाल्या होत्या. या मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. यावेळीही त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचे ठरले आहे. मात्र त्यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.  त्यामुळे भाजपचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निडणुकीचे चित्र पुढे येणार आहे.