Nashik Politics : नाशिकमध्ये (Nashik) आज पुन्हा राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळणार असून शहरातील विविध ठिकाणी राजकीय नेते (Political Leaders), मंत्री उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे आज नाशिकमध्ये राजकीय आखाडा रंगणार असल्याचे चित्र आहे. 


नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मनमाडला जाऊन आले. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) नाशिकला येऊन गेले. त्यामुळे नाशिक हे राजकीय केंद्र होत आहे. तर आज एक दोन केंद्रीय मंत्री दोन राज्यमंत्री नाशिकमध्ये आहेत. शिवाय अनेक नेत्यांची हजेरी असणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राजकीय नेत्यांची उठबस वाढलेली दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा नाशिक जिल्ह्याला भेट दिली होती. तर त्याचदरम्यान, भाजकडून देखील नाशिकमध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली होती. 


दरम्यान आज आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे नाशिक दौऱ्यावर असून देवळाली कॅम्प येथील कलापूर्णम या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमास ते उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यानंतर दुपारी देवळाली कॅम्प परिसरातच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे देखील नाशिक दौऱ्यावर असून ते आज दुपारी दोन वाजता मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे पाणीपुरवठा योजनेच्या भूमी पूजन कार्यक्रमात उपस्थित लागणार आहेत. त्यानंतर ते सायंकाळी चार वाजता दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर ते शासकीय वाहनाने घोटीकडे मार्गस्थ होणार आहेत. या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे.


तसेच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील नाशिकमध्ये असून ते उद्या होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी म्हणजेच भगुर येथे येणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मा अर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थिती लावणार आहेत. तर दुसरीकडे मंत्री दादा भुसे हे देखील नाशिकमध्ये असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत आणि कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये मालेगाव, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, त्याचबरोबर घोटी येथील कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे देखील नाशिकमध्ये असून विविध कार्यक्रमांना उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर आमदार रोहित पवार हे देखील नाशिकमध्ये असून ते शहरातील केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवाकेंद्रित उपक्रमानिमित्त संवाद साधणार आहेत.