Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Pune University) प्र. कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (Vice Chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी ते कुलगुरुपदी कार्यरत राहतील. त्यानुसार डॉ. सोनवणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरू ठरले आहेत. डॉ. सोनवणे (Dr. Sanjeev Sonwane) यांच्या निवडीचे आदेश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.
नाशिक (Nashik) येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (Nashik open University) कुलगुरू डॉ. ई वायूनंदन यांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली. डॉ. सोनवणे हे पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू म्हणून कार्यरत होते. त्यांनी कम्युनिकेशन आणि गणित या विषयात एमएस्सी, डिस्टन्स एज्युकेशन विषयात एमए, एमपी.एड आणि पीएच.डी. केलेली आहे. इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स, माइंड ट्री हेलन केलर अवॉर्ड आणि पुणे महापालिकेचा बेस्ट टीचर्स पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सोनवणे यांनी विविध परिषदेत सहभागी होत सहा आंतरराष्ट्रीय तसेच 23 राष्ट्रीय शोध निबंध सादर केले आहेत.
प्रा. संजीव सोनवणे (Sanjiv Sonwane) हे मूळचे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील टाकळी खादगाव येथील आहेत. सुरवातीला चंद्रशेखर आगाशे बीएड महाविद्यालयात 1987 मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून 26 डिसेंबर 2005 सेवेला सुरुवात केली. त्यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत विभागप्रमुख, अधिष्ठाता, सिनेट सदस्या, व्यवस्थापन परिषद सदस्य, प्र-कुलगुरु अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. प्रा.डॉ.ई. वायुनंदन यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभारी पदभार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. कुलगुरु निवड प्रक्रियेतील बदलासाठी तत्कालीन महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु असल्याने निवड प्रक्रिया ठप्प झालेली होती. दरम्यानच्या कालावधीत देशभरातील विद्यापीठांत कुलगुरु निवड प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर मुक्त विद्यापीठाच्या निवड समितीकडून पुन्हा प्रक्रिया हाती घेतली होती.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख तसेच आणखी दर्जेदार कसे होतील, यावर भर असेल. विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर सर्व अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात येईल. तसेच ते अधिक रोजगार अभिमुख करत आधुनिक तंत्रज्ञनाद्वारे ते गरजू पर्यंत पोचविण्यात येईल, असेही नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलगुरू यांनी सांगितले.