Nashik Politics : नाशिक (Nashik) शहरात आता गटातटाच्या राजकारणाचा (Politics) सामना करावा लागत आहे. नुकतेच शहर समन्वयक सचिन भोसले यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात (shinde sena) प्रवेश केला. तसेच पक्षातील अजून काही पदाधिकारी हे शिंदे गटात दाखल होण्याची चर्चा असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे दोन दिवसे नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
नाशिकच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशातच मागील प्रवेशावेळी मनसेचे पदाधिकारी असलेल्या सचिन भोसले यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांना गळती लागू नये यासाठी मनसे नेते अमित ठाकरे नाशिक मध्ये आले आहेत. दोन दिवस ते नाशिक शहरात तळ ठोकून राहणार असून यामध्ये ते नाशिक शहरातील शाखाध्यक्षांशी संवाद साधून आगामी काळातील डॅमेज कंट्रोलसाठी मोर्चेबांधणी करणार असल्याचे समजते. त्यामुळे नाशिकमध्ये चांगलीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळत असून आता मनसेने देखील इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी थेट अमित ठाकरे यांना पाचारण केले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत असून नुकतेच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. ते शहरात असेपर्यंत सर्व आलबेल दिसत होते. मात्र त्यांची पाठ फिरताच माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. तसाच प्रयोग हा मनसेत होतो की काय याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. मनसेचे माजी शहर समन्वयक सचिन भोसले यांचे संघटन कौशल्य उत्तम असल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांची मोट बांधली होती. परंतु त्यांच्या जाण्यामुळेच मनसेला खिंडार पडले. मात्र अमित ठाकरे हे पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून पक्ष बांधणी अधिक मजबूत करतील असा दावा काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान अमित ठाकरे हे आज राजगड येथे सकाळी 11 वाजता राजगड वाहतूक शाखेचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते तीन ते चार तास शाखाध्यक्षांसोबत संवाद साधणार आहेत. तर दुपारनंतर मनविसे पदाधिकारी नियुक्ती संदर्भात बैठक घेणार असून मुख्य कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर बुधवारी सकाळी शाखाध्यक्षांशी चर्चा करतील. त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अमित ठाकरे करणार आहेत. देखील काही पदाधिकाऱ्यांचे गाठीभेटी तसेच पंचवटी, इंदिरानगर, विनय नगर येथील शाखांचे उद्घाटन देखील ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. भोसले नुकतेच पक्ष सोडून गेल्याने त्यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते? याकडे देखील मनसे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.