Ahilyabai Holkar Jayanti : मराठी साम्राज्याची राणी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या, पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा अशी ओळख असलेल्या, तसेच होळकर घराण्याचा 'मान' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. 


महाराणी अहिल्याबाई होळकर आणि नाशिक जिल्ह्यातील चांदवड यांचं घट्ट नातं आहे. चांदवड हे होळकर घराण्याची उपराजधानी म्हणून ओळखली जायची. साधारण 1750 च्या सुमारास मल्हार राव होळकर यांच्या युद्धातील कामगिरीमुळे प्रभावित होऊन दिल्लीच्या बादशहाने त्यांना चांदवड प्रांताची सुभेदारी दिली. आणि तेव्हापासून चांदवड परगण्यावर इंदोरच्या होळकर घराण्याची अधिसत्ता प्रस्थापित झाली. साधारण 1750 ते 1765 या काळात राणी अहिल्यादेवींनी संपूर्ण चांदवड शहराची तटबंदी केली. शहरात प्रवेश करण्यासाठी सात भव्य प्रवेशद्वारे बांधण्यात आले. आतमध्ये किल्ल्यासारखा भव्य राजवाडा होता. हाच रंगमहाल किंवा होळकर वाडा. पूर्वीच्या चांदवडचा बराचसा भाग रंगमहालाने व्यापला आहे.


रंगमहाल चांदवडच्या इतिहासाचा साक्षीदार मानला जातो. स्वातंत्र्यानंतर रंगमहालामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, कृषी विभाग, आयटीआय, भूविकास बँक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा प्रकारची सुमारे 21 कार्यालये 1961 पासून एका कार्यरत होती. चांदवड तालुक्यातील अनेक लोक इथे आपल्या कामानिमित्त येत रोज वाड्याची साफसफाई होत असे. जणू आजही देवी अहिल्याबाई होळकर राज्यकारभार चालवताय असा भास होत असे, असे येथील नागरिक सांगतात. 


सध्या या रंगमहालाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून सर्व कार्यालये इथुन स्थलांतर करण्यात आली आहेत. नूतनीकरणाच्या कामातून लाकडी कोरीव काम  करण्यात येत आहे. यासाठी राजस्थान येथील कुशल कारागीरांनी मेहनत घेतली असून यात नव्या जुन्या कामात फरकच समजून येत नसल्याचे नागरिकांनी सांगतात. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी वाड्यात बांधलेली बारव पाहण्यासारखी आहे, इथुन संपूर्ण चांदवड तालुक्यातील गांवांना पाणीपुरवठा होत असे. दुष्काळाची झळ कमी बसत असे.
           
म्हणून रंगमहाल हे नाव.... 


सह्याद्रीच्या पर्वत रांगेत हा राजवाडा वसलेला असल्याने त्याचे महत्व विशेष आहे. कारण हा राजवाडा राजस्थानातील राजे महाराजांच्या भव्य दिव्य राजवाड्यासारखा आहे. राजवाड्याचे लाकडी कोरीव काम आपल्याला मोहात पडते. तसेच संपूर्ण चांदवड शहराची तहान भागविणारी बारव, दरबार हॉल यामुळे हा रंगमहाल ओळखला जातो. विशेष म्हणजे राजवाड्यातील आकर्षक रंगीत चित्रे होय. यामुळे यास रंगमहाल म्हणून ओळखले जाते. कारण रा राजवाड्यातील चित्रांमध्ये प्रामुख्याने निसर्गचित्रे, पशुपक्षी, प्रथा, प्रम,परंपरा, वेशभूषा आदींचा अंतर्भाव आढळतो. विशेष म्हणजे आजही या ठिकाणी राणी अहिल्यादेवींचे सुमारे 250 पूर्वीचे तैलचित्र जपून ठेवण्यात आले आहेत.