Aditya Thackeray : आमच्यासाठी कठीण काळ होता, उद्धव साहेबांचं (Udhhav Thackeray) ऑपरेशन झालं होतं. आणि दुसरा ऑपरेशन करायचं होतं त्यावेळी मलाही परदेशात जायचं होतं मात्र दुसरीकडे सरकार पाडण्यासाठी कुटील डाव सुरू होता आणि तेच झालं. त्यामुळे जे उद्धव साहेबांचे नाही झाले, ते तुमचे काय होणार, महाराष्ट्राचे काय होणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) जळगाव येथील (Jalgaon) बंडखोर आमदारांवर केला.


शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आता आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. सध्या आदित्य ठाकरे यांचा शिवस्वाद दौरा जोरदार शक्ती प्रदर्शनात सुरू आहे. सध्या शिवसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू असून आज ते जळगाव मध्ये आहेत. त्यावेळी ते बोलत होते. 


आदित्य ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, बंडखोर आमदार म्हणता आहेत की आम्ही क्रांती केली, बंड केले, मात्र डरपोक गद्दार होते. गुवाहाटीला गेल्यावर हे 40 गद्दार धांगडधिंगा करत होते. त्यांना आसाममधील पूर दिसला नाही, लाखो लोक बेघर झाले होते. हे खरोखर शिवसैनिक असते तर त्यांनी पुरात अडकलेल्याना मदत केली असती. शेतकरी आत्महत्या महिला अत्याचार यावर कोणी बोलत नसल्याचे ते म्हणाले. 


हे सरकार कोसळणारच! 
आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत हे बेकायदेशीर सरकार आहे, कोसळणार म्हणजे कोसळणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. 
हे सर्व 40 आमदार एक दोन लोकांच्या राक्षसी महत्वाकांक्षे पोटी गेले आहेत, मात्र हिंदुत्वासाठी गेले नाही. उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला तेव्हा बार नाचत असल्यासारखे नाचत होते. ही गद्दारी शिवसेना सोबत नाही, माणुसकी सोबत आहे. मी पुन्हा पुन्हा बोलत नाही पण लोकांना कळायला पाहिजे म्हणून त्यांच्या मतदारसंघात जाऊन बोलणार म्हणजे बोलणारच असे परखडपणे आदित्य ठाकरेंनी सुनावले. 


साहेब आजारी तेव्हा हे षडयंत्र रचत होते...!
दरम्यान दिवाळीच्या काळात वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे आमदार आले होते. यावेळी त्या सर्वांनी जेवण केले. उध्दव साहेबांचे ऑपरेशन करायचे होते, मला जागतिक परिषदे साठी जायचे होते. उध्दव साहेब यांनी जायला सांगितले. साहेबांचे एक ऑपरेशन झाले दुसरे तत्काळ करावे लागले. यावेळी हे गद्दार साहेबांना मदत करण्या ऐवजी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे जे उध्दव साहेबांचे नाही झाले ते महाराष्ट्र आणि तुमचे काय होणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


आमदारकीचा राजीनामा द्या...!
उद्धव साहेबांची तब्येत बरी नसल्याने त्यांना सातत्याने रुग्णालयात न्यावे लागत होते. मुख्यमंत्र्यांचे कुटुंब खचले तर राज्य काय करणार? असेही वाटत होतं. मात्र त्याही वेळी उध्दव साहेब राज्याचा आढावा घेत होते. तर दुसरीकडे हे गद्दार साहेबांना मदत करण्याऐवजी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. आता सद्यस्थितीत ज्यांना मंत्रीपद दिले आहे. ते आमच्या बरोबर होते. आपण चांगले खाते दिले आता त्यांना लायकी दाखविली. आपण लायकी पेक्षा जास्त दिले हीच आपली चूक आहे. मात्र गद्दार बनून राहायचे असेल तर जा, पण आधी आमदारकीचा राजीनामा द्या आणि होऊन जाऊद्या असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.