Nashik News : नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) आता शहरातील मीटर नसलेल्या तसेच बोगस नळ कनेक्शन (Bogus Water Connection) घेऊन पाणी चोरी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणार आहे. यासाठी महापालिकेच्या कर्मचारी पथकाच्या माध्यमातून शहरातील बोगस नळ कनेक्शनचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरातील बोगस नळधारकांचे धाबे दणाणणार आहे. 


नाशिक महापालिकेने शहरातील प्रत्येक कुटुंबियांना पालिकेच्या माध्यमातून नळ कनेक्शन बहाल केले आहेत. जवळपास शहरातील दहा लाख दहा हजार च्या आसपास नळ जोडण्या आहेत. मात्र बोगस नळ कनेक्‍शनधारकांची संख्याही काही कमी नाही. त्यांच्यासमोर आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र महापालिका नागरिकांची बोगसगिरी समोर आणणार आहे. अनेक दिवसांपासून चाललेला पाण्याचा बेकायदेशीर वापर उघड होणार आहे. 


नाशिक मनपा हद्दीतील नागरिकांना नळ कनेक्शनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी त्यांच्याकडून पाणी पट्टी घेतली जाते. मात्र, अनेकजण अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे पाणी वापर करत असल्याचे आढळून आले आहे. अशा मंडळींवर चाप बसण्यासाठी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी हि मोहीम घेतली आहे. त्यामुळं आता महापालिका कार्यक्षेत्रातील असे अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यात येऊन त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.


सध्या नाशिक महापालिकेकडून दरवर्षी पाणीपुरवठा विभागावर ९५ कोटी रुपये खर्च करते. यामध्ये पाईपलाईन दुरूस्ती यासह इतर कामे केली जातात. तसेच 55 कोटी रुपयांचे वीज शुल्क आणि जलसंपदा विभागाला वर्षाकाठी पाणी उपसा करण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या बिलांचाही समावेश होतो. नाशिकला तीन धरणातून होणार पाणी पुरवठा, नागरिकांकडून होणारी पाणीचोरी, मीटर आणि बोगस नळ कनेक्शन, पाणी गळतीमुळे महापालिकेचे 35 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


मनपा आयुक्त रमेश पवार म्हणाले कि, नाशिक शहरातील बोगस नळ धारकांवर तसेच मीटर नसलेल्या कनेक्शन शोधले जात आहेत. यासाठी महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांची पथके तयार करून शहरात पाहणी केली जात आहे. त्याचबरोबर शहरातील हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना आणि बांधकाम साईट्सवर होत असलेल्या पाणी चोरी संदर्भात पाहणी केली जाणार आहे. यासाठी मनपा पथकांद्वारे शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनची तपासणी करण्यात येणार आहे. 


शहरात सध्या अस्तित्वात असलेले नळ कनेक्शन आणि महापालिकेकडे असलेल्या नळ कनेक्शनची नोंद, यामध्ये प्रत्यक्ष स्थिती काय? यातील काळेभेरे शोधण्यासाठी पालिकेने शोध मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी शहरातील बेकायदेशीर टॉवर्सवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये खाजगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील अनधिकृत टॉवर्स शोधण्यात येऊन जवळपास ८१० बेकायदेशीर टॉवर्स आढळून आले होते. त्यानुसार पाणी चोरणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.