Pimpalgaon Toll : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत टोलनाका (Pimpalgaon Toll) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पिंपळगाव टोल नाक्यावर थेट नाशिक ग्रामीणचे अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांना अडवून हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे.  


नाशिकचा पिंपळगाव टोल नाका (Pimpalgaon Toll Plaza) राज्यभरात कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी एका स्थानिक आमदाराला येथील कर्मचाऱ्यांनी सोडलं नसल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच आता नाशिक ग्रामीणची गुन्हेगारी रोखणाऱ्या पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना टोलनाक्याच्या आणि मुजोरीचा फटका बसला आहे. यामुळे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना बोलावून घेत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान  पोलीस अधीक्षकांचीच गाडी अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. 


दरम्यान पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर हुज्जत घालण्याचे प्रकार नित्याचे असून गेल्या आठवड्यात टोल कर्मचाऱ्याने एका दैनिकाच्या उपसंपादकाला बातमी दिली म्हणून दमबाजी केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता चक्क पोलीस अधीक्षकांची गाडी अडवून त्यांच्यासोबत दांडगाईचा प्रकार घडला आहे. युनिफॉर्म असताना आणि शासकीय गाडी असताना देखील टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली आहे. टोल नाक्यावर सिक्युरिटी ठेवण्याची  परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाले आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोल नाका कर्मचाऱ्यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अशी घडली घटना 
पिंपळगाव कडून नाशिकच्या दिशेने ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांची गाडी जात असताना टोलनाक्याच्या लेन जवळ आल्यानंतर स्वतंत्रलेन बंद असल्याने गाडी दुसऱ्या लेनला नेण्यात आली. मात्र 15 ते 20 मिनिटे होऊनही लेन खुली होत नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी याबाबत विचारणा केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नाही आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी हुज्जत घालत अरेरावी केली. त्यामुळे नाईलाजाने संतापून पोलीस अधीक्षक यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून प्रचलित असलेले पोलीस अधीक्षक सचिन पाटील मालेगाव येथून शासकीय कामकाज आटोपून परतत असताना हा सर्व प्रकार घडला आहे. याबाबत रात्री उशिरा पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टोलनाका वादाच्या भोवऱ्यात 
दरम्यान पिंपळगाव बसवंत टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी देखील अनेक घटना या टोलनाक्यावर घडल्या आहेत. त्यामुळे टोल वसुली करणाऱ्यांनी मुद्दामहून भाईगिरीची भाषा करणारे कर्मचारी नेमलेत कि काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. आमदार असो, खासदार, महिला असो कि पुरुष सगळ्यांनाच येथील कर्मचाऱ्यांचा अरेरावीची प्रत्यय आला आहे. आता थेट पोलीस अधीक्षकांनाच दांडगाई दाखविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर सामान्य नागरिकांना हा नित्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.