Nashik Child Trafficking : 'पोलिसांनी कारवाई करण्याअगोदर मुलांकडून संपर्क क्रमांक घेऊन पालक म्हणून आमच्याशी संपर्क करायला हवा होता'. 'पण पोलिसांनी तसे केले नाही, कोणीतरी चुकीचं ट्वीट केलं आणि पोलिसांनी मौलानांना पकडलं असल्याची प्रतिक्रिया दोन दिवसांपूर्वी मानवी तस्करीच्या संशयाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या बालकांच्या पालकांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांत मुलांच्या सुटकेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दाणापुर-पुणे एक्स्प्रेसमधून (Danapur-Pune Express) अल्पवयीन मुलांची तस्करी (Child Trafficking) केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (Railway Police) तात्काळ रेल्वेची तपासणी करत यातील 59 मुलांना भुसावळ (Bhusawal) आणि मनमाड स्थानकावर (Manmad) उतरून घेत त्यांना बालसुधार गृहात ठेवले होते. तर या मुलांना बिहारमधून सांगली (sangli) येथे मदरसामध्ये घेऊन जाणाऱ्या पाच जणांविरोधात भुसावळ आणि मनमाड स्थानकात गुन्हा दाखल करून अटक केली होती. या घटनेनंतर बालसुधार गृहात ठेवलेल्या बालकांना आणि त्यांना सांगली येथे मदरसामध्ये घेऊन जाणाऱ्या मौलवीला सोडविण्याच्या मागणीसाठी या मुलांचे पालक काल बिहारमधून (Bihar) थेट भुसावळ स्थानकात दाखल झाले होते. यावेळी पालकांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ही सर्व मुले बालसुधारगृहात ठेवण्यात आली असून त्यांना भेटण्यासाठी पालक भुसावळ येथून जळगाव येथे दाखल झाले आहेत. दरम्यान बिहारहून दाखल झालेल्या पालकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मुस्लिम मणियार बिरादरी आणि मुस्लिम मंचच्या वतीने भुसावळ येथील मदरसामध्ये करण्यात आली होती. जवळपास सर्वच पालक ग्रामीण भागातील असल्याने आणि अशिक्षित असल्याने कायदेशीर बाबीची त्यांची अडचण पाहता, जळगावमधील मुस्लिम मणियार बिरादरीकडून त्यांना कायदेशीर सल्लागार देण्यात आला आहे. या पालकांच्या वतीने मुस्लिम मणियार बिरादरीकडून बाल सुधार गृहाच्या बाल विकास समितीकडे सुधार गृहात असलेल्या बालकांना पालकांना भेटू देण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्याचे मणियार बिरादरी अध्यक्ष फारुख शेख यांनी म्हटले आहे.
गेल्या चार पाच दिवसापासून पालकांपासून दूर असलेल्या मुलांना पालकांची भेट घेण्यासाठी आपण बिहारवरून जळगाव आलो आहोत. आपल्या मुलांच्या भेटीचा आनंद तर होणारच आहे. त्याचबरोबर मुलांना बिहारकडे घेऊन जाणारे मौलवी यांनासुद्धा घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत. या प्रकरणात पोलिसांनी केलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याची भूमिका ही यावेळी पालकांनी व्यक्त केली आहे. बिरादरीच्या या पत्रावर बाल विकास समितीकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालकांना मुलांना भेटू दिले जाईल, असे महिला बाल विकास अधिकारी विजय परदेशी यांनी म्हटले होते. मुलांना भेटीची परवानगी देण्यात येणार असली तरी शनिवार, रविवार असल्याने मुलांच्या सुटकेबाबत बाल विकास समिती नक्की काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
पोलिसांनी आमच्याशी संपर्क करायला हवा होता...
दरम्यान बिहारवरून मुलांच्या भेटीसाठी त्याचबरोबर त्यांना माघारी नेण्यासाठी आलेल्या पालकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, मौलवी, हाफिज बनण्याचे व उर्दू शिक्षण घेण्यासाठी मुलांना इकडे पाठवले. गेल्या तीन वर्षांपासून मुले पाठवीत आहोत. गावातील मदरशांमध्ये मुले पाठविली की ते घरी निघून येतात. म्हणून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात मुले पाठवली. वर्षभर आता मुले इकडेच शिकतील. संपूर्ण तयारीनिशी मुलांना पाठवलं होतं. आमची मौलांनाविषयी कुठलीही तक्रार नाही, हे सगळं कसं झालं माहित नाही अशी प्रतिक्रिया 'त्या' मुलांच्या पालकांनी मनमाडमध्ये दिली. पोलिसांनी कारवाई करण्याअगोदर मुलांकडून आमचे दूरध्वनी नंबर घेवून पालक म्हणून आमच्याशी संपर्क करायला हवा होता. पण पोलिसांनी तसे केले नाही, कोणीतरी चुकीचं ट्विट केलं आणि पोलिसांनी मौलानांना पकडलं, पण हे चुकीचं आहे, असेही या मुलांच्या पालकांनी पत्रकारांशी बोलतांना दिली..
घटनेची पार्श्वभूमी काय?
बिहारहून सांगली येथे मदरशात शिक्षण घेण्यासाठी 30 मुलांसह 4 मौलानांना मनमाड रेल्वे स्थानकात दानापुर - पुणे एक्स्प्रेसमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 'मानवी तस्करी' असावी असा संशय असल्याने पोलिसांनी या 30 मुलांची सुटका करून त्यांना बाल सुधारगृहात पाठवले होते. आणि 4 मौलाना विरूध्द पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास म्हणून पोलिसांनी विविध पथके तयार करून ते सांगली आणि बिहारकडे पाठविली होती. पोलीस तपासाचा भाग म्हणून या मुलांची शहानिशा करण्यासाठी आज नाशिकच्या मनमाड येथे हे पालक दाखल झाले आहेत.