Dada Bhuse : शिंदे सरकारचे खाते वाटप झाले, मात्र नाही नाही म्हणता अनेक जणांमध्ये नाराजी दिसून येत आहे. उघड नसली तरी समर्थकांच्या माध्यमातून नाराजी उघड होत आहे. त्यातच मागील सरकारच्या काळात कृषिमंत्री पद भूषविलेले मालेगाव बाह्यचे (Malegoan)  दादा भुसें  (Dada Bhuse) यांना बंदरे व खनिकर्म खाते मिळाल्याने यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 


दरम्यान तब्बल दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis) सरकार स्थापन झाले. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मंत्री मंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. मंत्री मंडळ विस्तार सर्वच नव्याने विराजमान झालेल्या मंत्र्यांसहित समर्थकांना याबाबत उत्सुकता होती. मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा त्यानंतर खरी उत्सुकता लागली ती, खातेवाटपाची. त्यामुळे भुसे यांना चांगलेच खाते मिळेल अशी आशा असताना त्यांना बंदरे व खनिकर्म या खात्यावर बोळवण केली आहे. 


शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गट बाहेर पडल्यानंतर एकनिष्ठ असलेले भुसे हे शेवटपर्यंत मातोश्री बरोबर होते. मात्र त्यांनी देखील शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी साथ सोडून अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या एकनाथ शिंदे हेयांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत निभावलेल्या मैत्रीचे चीजही झाले. भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. 


पहिला दौरा नाशिकमधून...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भुसे जवळचे मित्र आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात मालेगावमधून केली. अपेक्षेप्रमाणे भुसे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर नाशिकमधून पहिला दौरा केला. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या संबंधामुळे त्यांना चांगले खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. ग्रामविकास, कृषी किंवा उद्योग यांपैकी एक खाते हमखास मिळेल, अशी अपेक्षा भुसेंसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र तसे झाले, नाही. कार्यकर्त्यांचा अपेक्षा भंग तर झालाच शिवाय कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सुर आहे.


पालकमंत्री पदही धूसर...
दरम्यान नाशिकच्या (Nashik) पालकमंत्री  पदासाठी सुरवातीपासूनच दादा भुसे यांचे नाव चर्चेत होते. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन यांना सांगण्यात आल्याने नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे   नाशिकचे पालकमंत्रिपद जाण्याच्या  शक्यतेमुळेदेखील भुसे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.


मंत्री दादा भुसे म्हणाले....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती यशस्वीपणे पार पाडणार आहे. शिवाय कृषिमंत्री असताना अनेकदा प्रवास व्हायचा, त्यामुळे दगदग होत असल्याने इतर कोणतेही खाते दिले तरी ते मी यथायोग्य पार पाडीन, असेही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे भुसेंनी सांगितले. त्यामुळे या खात्याची जबाबदारी सह जनतेची कामे करण्यासाठी कटिबद्ध असेन, अशी ग्वाही यावेळी भुसे यांनी दिली.