Nashik Fire Accidents : आजचा म्हणजेच शनिवारचा दिवस नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्रासाठी (North Maharashtra) घातवार ठरला असून तब्बल दहा ते बारा कुटुंबियांसाठी अत्यंत निराशाजणक ठरला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या अपघातात तब्बल 16 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना आज रोजी घडली आहे. शनिवारचा दिवस इतका घातक ठरला की, फक्त आणि फक्त अग्नितांडवच पाहायला मिळाले. 


आज सकाळपासूनच नाशिककरांना (Nashik) अपघातांच्या मालिकेला (Accident series) सामोरे जावे लागले असून यामुळे उत्तर महाराष्ट्रांसाठी आजचा दिवस घातकच ठरला आहे. पहिली घटना ही नाशिककरांची सकाळ सुन्न करणारी होती. नाशिकच्या औरंगाबाद रोडवर चिंतामणी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात (Nashik Bus Fire) होऊन तब्बल 12 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आजच्या अपघातस्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. 


सप्तश्रुंगी गडावर एसटीला आग 
सप्तश्रुंगी गडावर नवरात्री पासून यात्रा होत असते. याच यात्रेसाठी प्रवाशांनी भरलेली एसटी बस सप्तश्रुंगी गडावर निघाली होती. दरम्यान गडावर जात असताना अचानक बसला आग लागली. वेळीच आग लागल्याची माहिती प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रवाशांनी बसबाहेर उड्या घेतल्या. मात्र या घटनेतही बस जळाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्याचबरोबर स्थानिक नागरिक आणि गडावरील रोपेवेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत बचावकार्य करून प्रवाशांना सुरखरूप बाहेर काढले. तसेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 


मनमाड मार्गावरील घटना 
मनमाड पासून जवळ पुणे -इंदौर महामार्गांवर गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना घडली. दरम्यान ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे आगीची तीव्रता वाढली. तसेच वेळीच घटना लक्षात आल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रक मध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


संगमनेर येथील घटना 
तुटलेल्या विद्युत तारेच्या करंट तळ्यात उतरल्यानं संगमनेत तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. विद्युत तारेला चिकटून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील येठेवाडी गावात ही घटना घडली आहे. दर्शन अजित बर्डे (वय 6), विराज अजित बर्डे (वय 5) अनिकेत अरुण बर्डे (वय 6) ओंकार अरुण बर्डे (वय 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. विद्युत तारेला चिटकून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या घटनेनं संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंघोळीसाठी गेलेल्या तळ्यात तुटलेल्या विद्युत तारेच्या झटक्याने ही चारही मुलं दगावली. एकाच कुटुंबातील चौघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घराजवळ असलेल्या तळ्यावर चौघे अंघोळीसाठी गेले होते.  वादळी वाऱ्याने तुटलेल्या केबलमध्ये प्रवाह सुरूच असल्यानं ही दुर्दैवी घटना घडली.


पिंपळगाव बसवंतची घटना 
धुळ्याहून नाशिकला निघालेल्या वाटेत पिंपळगाव बसवंत येथे थांबलेल्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली. पेपर रोल घेऊन निघालेला हा ट्रक पेट्रोल पंपाशेजारी थांबला होता. यावेळी ट्रक ड्रॉयव्हर काही कामानिमित्त बाजूला गेला असता या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकमध्ये पेपर रोल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे काहीक्षणातच ट्रकचा कोळसा झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.