Nashik Advay Hiray : मागच्या काळातील पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत, तर भाजप (BJP) पक्षात व्यक्ती स्वातंत्र्य नाही, बोलण्यास स्वातंत्र्य नाही, आमचं सगळं स्क्रिप्टेड असतं, त्यामुळे मी बोलत नव्हतो तर भाजप बोलत होतं, अशा शब्दांत अद्वय हिरे (Advay Hiray) यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या अद्वय हिरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश  केला.  


शिंदे गटाने (Shinde Sena) ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक दणके दिल्यानंतर ठाकरे गटानेही पलटवार केला आहे. थेट जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याच समोर आव्हान उभं करण्याची रणनीती आखली आहे. भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानं मालेगावमध्ये पुन्हा एकदा भुसे आणि हिरे यांच्यातील सामना रंगणार आहे. पक्ष प्रवेश झाल्यानंतर अद्वय हिरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 2009 पासून भारतीय जनता पक्षासोबत काम करतो आहे, गोपीनाथ मुंढे साहेबानी विनंती केल्यानंतर पक्षात प्रवेश केला. मी ज्यावेळी पक्ष प्रवेश करत होतो, त्यावेळी भाजप पक्षातील सर्व पदाधिकारी भाजप सोडून जात होते. 


मालेगाव (Malegaon) तालुक्यात भाजपचे अस्तित्व नव्हतं, तेव्हा सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याची लाट होती, त्यावेळी अमरीश पटेलसारख्या नेत्याला पाडून भाजप पक्ष उभा केला. गावागावातील जिल्हा परीषद सदस्य, नगरपरिषद सदस्य, सरपंच, असंख्य पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये सामावून घेत पदावर बसवलं. पण आता पन्नास गद्दार भारतीय जनता पक्षच्या मांडीवर बसल्यानंतर भाजपला आमची गरज राहिली नाही. त्या काळात मी कुठल्याही पदासाठी किंवा तिकिटासाठी भाजप पक्षाकडे मागणी केली नाही. माझ्या सारख्या सामान्य शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर उतरलो, भाजपकडे न्याय मागण्याची भूमिका घेतली, मात्र पक्षाने दुर्लक्ष करत शेतकऱ्याला मरु दिलं. तालुक्यातील शेतकऱ्याला वाचविण्यासाठी पक्ष उभा राहिला नाही, म्हणून जो शेतकऱ्याला वाचवू शकत नाही, त्याच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही, ही भूमिका घेणे भाग पडल्याचे हिरे म्हणाले. . 


दरम्यान आंदोलनानंतर समर्थकांची बैठक घेत भारतीय जनता पक्षाचा त्याग केला. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज शिवसेनेत सहभागी झालो आहोत, कालपासून भाजप पक्षाला इतकी आठवण आली की, प्रदेशाध्यक्षांपासून ते असंख्य लोकांचे फोन आले, आज तर इतके फोन यायला की फोन बंद करून ठेवला. त्यांना स्पष्टपणे सांगितले की कितीही खोके दिले तरी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार नाही, पैशांसाठी व सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद आपली नाही, अशा शब्दात खडसावल्याचे ते म्हणाले. 


उद्धव ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री करणार... 


मालेगाव तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रात शिवसेना कशी उभी राहील, शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवसेना सोडून लोक निघून चालले आहेत, शिवसेना संपते आहे, हा गैरसमज आहे, या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे. तसा  पहिलाच भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलोय, अजून 49 मतदारसंघातून नेते, कार्यकर्ते बाहेर पडणार आहेत, त्यांची पक्षात कुचंबणा होत असल्याने हे होत आहे, ज्या दिवशी निवडणुका लागतील त्या दिवशी भाजपमधून सर्व नेते बाहेर पडणार आहेत.


भाजपचं सर्वकाही स्क्रिप्टेड


तसेच शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचे उघड झाल्यापासून माझ्या मागच्या काळातील पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत, तर इथे एक सांगू इच्छितो की, तर भाजप पक्षात व्यक्ती स्वतंत्र नाही. बोलण्यास स्वातंत्र्य नाही, एखादी सभा ठेवल्यावर आम्हाला सभेच्या सकाळी एक काळी टोपी येते, यात काय बोलायचं काय नाही हे सांगितलं नाही. आमचा सगळं स्क्रिप्टेड असतं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पाहिले असेल तर ते कागद असल्याशिवाय काही बोलत नाहीत,  भाजपमध्ये सगळं स्क्रिप्टेड असतं. थोड्याच दिवसांत गद्दाराच्या लक्षात येईलच, असा इशारा देखील अद्वय हिरे यांनी  दिला.