Nashik Ganeshotsav : नाशिक (Nashik) शहरातून मोठ्या प्रमाणात गणपतीचे विसर्जन (Ganesh Immersion) गोदावरीत होत असल्याने, अनेक भागात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी सरकारने जवळपास सर्वच सण- उत्सवांवरील निर्बंध हटवल्याने, मोठ्या प्रमाणात घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दोन दिवसांनी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे, त्यामुळे यंदातरी प्रशासनाला घालून दिलेल्या नियमांचे पालन करून विसर्जन करण्यात येईल का? असा सवाल उपस्थित होतो आहे. 


यंदा नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) निमित्ताने उत्साहाचे वातावरण असून गेल्या आठ दिवसांपासून नाशिककर गणेशोत्सवाचा आनंद घेत आहेत. तर दोन दिवसांनी गणरायाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून यासाठी विविध ठिकाणी विसर्जन स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. दरम्यान यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावर संपूर्ण बंदीचा आदेश नाशिकने मनपा तीन महिन्यापूर्वीच जारी केलेला आहे. तरीही बाजारात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीं शाडूच्या मूर्ती म्हणून विक्रीला आल्या असतील त्या घरोघरी मंडळात स्थापन झाल्या असतील. 


नाशिक मनपा (Nashik NMC) प्रशासनाकडून विसर्जनसाठी चोख तयारी केली असताना मागील अनेक वर्षांचा अनुभव बघता अनेकदा नागरिक गोदावरीत सर्रास मुर्त्या विसर्जित करत असतात. या मूर्तींना रासायनिक रंग दिलेला असतो. त्या रंगांमध्ये कॅडमियम आणि शिसे यासारख्या धातूंची विषारी संयुगे असतात. ती काही प्रमाणात पाण्यात विरघळल्याने हे प्रदूषित पाणी जर प्राणी आणि पक्षी यांच्या पिण्यात आले, तर त्यांना पोटाचे दुर्धर आजार होऊन, ते मृत्युमुखी पडतात, असे दिसून आले असल्याचे नाशिक अनिसचे म्हणणे आहे. 


दरम्यान सर्वच सण-उत्सव हे पर्यावरण पूरक साजरे करावेत, म्हणून 1993 पासून महाराष्ट्र अंनिस प्रयत्नशील आहे .सुरुवातीला निर्माल्य संकलन चालू केल्यानंतर संघटनेने विसर्जनासाठी पर्यायी हौद बांधण्याचा आग्रह धरला. त्याप्रमाणे अनेक मोठ्या शहरात असे कृत्रिम हौद बांधण्यात आले आहेत .मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात घरगुती गणपतीचे विसर्जन पाण्याच्या स्त्रोतातच होत असते. 2005 साली सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले आहे की, कोणत्याही कारणाने होणारे पाण्याचे प्रदूषण हा दंडनीय अपराध आहे, ही बाब  लोकांना सांगावी. मात्र या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात प्रशासन नेहमीच कमी पडत आले आहे  किंवा त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले जात असते, असे दिसून येते.


अनिसकडून आवाहन 
भाविक- भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत निर्माल्य व गणपतीची मूर्ती कोणत्याही पाण्याच्या स्त्रोतात विसर्जित न करता घरच्या घरी बादली किंवा छोट्या हौदात पाणी घेऊन त्यात ती विसर्जित करावी आणि ते सर्व पाणी आणि माती रोपाच्या कुंडीत किंवा वृक्षाच्या खोडाशी खड्डा करून, पुरून टाकावे, तसेच महानगरपालिका नाशिक यांनी विसर्जनासाठी जे कृत्रिम हौद ठिकठिकाणी केलेले आहेत, तेथेच मूर्तींचे विसर्जन करावे आणि तेथील कलशातच निर्माल्य द्यावे  असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.