Heena Gavit : नंदुरबार (Nandurbar) लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉ. हिना गावित (MP Dr Heena Gavit) यांच्या गाडीचा अपघात झाल्याने खासदार गावित किरकोळ जखमी झाल्या आहेत. शिवाय सहकारी देखील जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर डॉ. गावित या पुढील उपचारासाठी मुंबईकडे (Mumbai) रवाना झाल्या आहेत. 


नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावित दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आदिवासी दिनाच्या (Tribal Day) कार्यक्रमा निमित्ताने अनेक कार्यक्रमांना भेट देत आहेत. अशातच आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाईक रॅलीच्या (Baike Rally) उद्घटनासाठी जात असताना हा अपघात घडला. सकाळी त्या घरातून निघाल्यानंतर शहरातील कोरीट नाका येथे रॅलीचा शुभारंभ होता. हा शुभारंभ आटोपून त्या एका पतसंस्थेच्या कार्यक्रमासाठी शहरातील एका ठिकाणी जात असताना अचानक मोटारसायकलस्वार अचानक गाडीसमोर आल्याने हा अपघात झाला.


अचानक गाडीसमोर आलेल्या दुचाकीस्वाला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना खासदार हिना गावित यांची गाडी झाडावर आदळली. या अपघातात खासदार हिना गावित यांच्यासोबत असलेले चार कार्यकर्तेही किरकोळ जखमी झालेले आहेत तर मोटर सायकल स्वारही जखमी झाले आहेत. या अपघातात खासदार हिना गावित यांच्या नाकाला मार लागला असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिले आहे. 


दरम्यान 09 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनानिमित्त अनेक भागात रॅलीचे आयोजन केले जाते. शहरातील कोरीट नाका येथील युवकांनी देखील बाईक रॅली काढण्याचे नियोजन केल्याने या बाईक रॅलीच्या उदघाटनासाठी डॉ. गावित ह्या चालल्या होत्या. दरम्यान रॅली उदघाटन समारंभ पार पडल्यानंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या शहरातील गुरव चौक येथे अचानक मोटारसायकलस्वार आल्याने अपघात झाला. डॉ. हिना गावित यांची गाडी थेट समोरील झाडावर जाऊन आदळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. 


मुंबईला पुढील उपचार 
तर अपघातात डॉ.  हिना गावित यांना देखील किरकोळ दुखापत झाली असून नंदुरबार शहरातील तुळशी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता खासदार हिना गावित यांच्या नाकाला दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान स्थानिक रुग्णालयातील उपचारानंतर अधिकच्या उपचारासाठी आणि तपासणीसाठी मुंबईला निघाले आहेत. खासदार हिना गावित यांच्या अपघाताची बातमी समजल्यानंतर सर्व क्षेत्रातील तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून तब्येतीची विचारपूस केली आहे.