Nashik Rain : गेल्या तीन दिवसांपासून (Godavari) सुरु असलेल्या पावसामुळे गोदामाई खळाळली आहे. तर नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील धरणसाठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे गोदाकाठी अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


नाशिक (Nashik) जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत होता, मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने धरण साठ्यात वाढ झाली आहे. गोदावरिला देखील पूर आला असून दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आहे. गंगापूरच्या (Gangapur) मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या होळकर पुलाखालून 7 हजार क्युसेकने पाणी रामकुंडात (Ramkund) प्रवाहित आहे. यामुळे नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


दरम्यान पहिल्या पावसानंतर गोदामाईत गटाराचे पाणी मिश्रित झाले होते. मात्र गोदामाई पूर्ण प्रवाहित झाली असून गॊदाकाठी असलेल्या टपऱ्या, इतर दुकाने बाजूला करण्यात आली आहेत. शिवाय नदीकाठची दुकाने देखील उठवण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून पावसाने इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह गंगापूर धरण परिसर आणि शहरालाही झोडपून काढले. नाशिक शहरात गेल्या 24 तासांत 77 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहर परिसराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. 


गोदाकाठी सतर्कतेचा इशारा 
नाशिकची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या होळकर पुलाखालून 7 हजार क्युसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शिवाय दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. 


नाशिक शहरात 77 मिमी पाऊस 
नाशिक शहरात गेल्या 24 तासांत 77 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु असून गंगापूर धरणासह जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणात सद्यस्थितीत 55 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नाशिक शहरावरील पाणी कपातीचे संकटही दूर झाले आहे.