Nashik News : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी 1925 मध्ये सुरु केलेल्या नाशिकरोड येथील चलनी नोटांच्या कारखान्यात दुर्मिळ नोटांचा खजिना नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. अडीच रुपयांच्या नोटेपासून ते दहा हजारांच्या नोटेपर्यंत अशा विविध प्रकारच्या नोटा नाशिकच्या नोट प्रेसमध्ये पाहायला, अनुभवयाला मिळत आहेत. 


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे वतीने जुन्या नोटांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. जेल रोड वरील समोरील जागेत सुरू असलेल्या तीन दिवसीय प्रदर्शनात नाशिककरांना दुर्मिळ नोटा बघण्याची अनमोल संधी मिळत आहे. ब्रिटिशांच्या काळात भारतात चलनात आणलेल्या नोटापासून ते नाशिकरोडच्या नोट प्रेसमध्ये छापण्यात आलेल्या पहिल्या नोटेचा दुर्मीळ खजिना, नोटांवरील पोस्टचा रंजक इतिहास, महात्मा गांधीजींच्या नोटांची मालिका इतकेच कशाला तर नोटांचा बदलत गेलेला आकार आणि इतर देशांचे चलन स्थापण्याचा अद्भुत प्रवास नाशिककरांना अनुभवता येणार आहे. 


दरम्यान भारतीय नोटांच्या अठराव्या शतकापासूनचा इतिहास ते आजपर्यंतच्या वाटचालीची इत्यंभूत माहिती देणारे, ज्ञानात मोलाची भूल भर घालणारे हे भव्य प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले आहे. नोटांबाबतची इत्यंभूत माहिती देण्यासाठी 15 तज्ञ अभ्यासु कर्मचारी आहेत. प्रदर्शनात अडीच रुपयांची नोट, पाच हजार आणि दहा हजाराची नोट, एकदा वापरात आलेली, फाडून टाकली जाणारी आणि हाताने बनवलेली नोट अशा प्रकारच्या नोटा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आपण नोटेवर गांधी, किंवा राजा महाराजांचे चित्र पाहिले असेल मात्र इराकच्या नोटेवर एका लहान मुलाचे चित्र छापण्यात आले होते. ते नाशिकच्या नोट प्रेसमध्ये. ती नोट देखील प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. जवळपास 1861 पासून ब्रिटिशांनी भारतातील व्यवहारासाठी छापण्यात आलेल्या नोटा पासून ते सध्या चलनात असलेल्या नोटांचा खजिना या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. 


इथल्या नोटांची छपाई 
नाशिकरोड येथील नोट प्रेसमधील विविध देशातील चलनी नोटा छापण्यात आल्या होत्या. यामधेय ईस्ट आफ्रिका, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, इराण या देशांचे चलन देखील छापण्यात आले आहे. 1950 अगोदर पर्यंत अशा नोटांची छपाई सुरू होती. तर 1931 मध्ये नाशिकरोडच्या प्रेसमध्ये इराक साठी दिनार हे चलन छापण्यात आले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या नोटेवर असलेले पोट्रेट हे तेरा वर्षे बालकाचे होते. एखाद्या लहान मुलाचे चित्र असलेली ही जगातील पहिलीच नोट होती. आज या नोटेची किंमत जवळपास 30 लाख रुपये इतकी आहे. 


नाशिककरांना अनमोल ठेवा 
नाशिककरांना नोटांचा अनमोल खजिना अनुभवता येणार आहे. विशेष नाशिकच्या नोट प्रेसमध्ये इतर नागरिकांना प्रवेश नसतो. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे प्रदर्शन भरविण्यात आल्याने सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. प्रदर्शनात जाताना आधारकार्ड सोबत असणं अनिवार्य आहे. नियुक्त केलेल्या अभ्यासकांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीमुळे नोटांची जगाची सफर घडविली जाते.