Nashik Corona Update :  राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने काढता पाय घेतला होता. मात्र हा पाहून पुन्हा एकदा उंबरठ्यावर आला असून हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागल्याचे चित्र राज्यासह नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. 


नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत गुरुवारी दुपटीहून अधिक वाढ होत तब्बल साडेतीन महिन्यांत बाधित संख्या दुहेरी आकड्यात अर्थात 19 वर पोहोचली आहे. त्यात तेरा बाधित शहरातील तर ग्रामीणचे तीन तर जिल्हाबाह्य तीन रुग्णांचा समावेश आहे. अचानकपणे तीन दिवसात रुग्णसंख्या वाढू लागल्याने त्यातही पावसाचे आगमन झाले नाही कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट नाशकात जानेवारी महिन्यात आल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती लक्षणीयरीत्या निवळली होती. त्यामुळे कोरोनाची दहशत तिसऱ्या लाटेनंतर लगेचच ओसरली होती. त्यामुळे चार महिन्यात परिस्थिती बर्‍यापैकी पूर्वपदावर येऊन सामान्य नागरिकांचे जनजीवन सुरळीत पणे सुरु झाले होते. 


तिसर्‍या लाटेत बाधितांचा वेग असला तरी बहुतांशी नागरिकांचे एक किंवा दोन डोस झालेले असल्याने ते घरीच उपचार घेऊन बरे झाले होते. त्यामुळे कोरोनाच्या थैमानाची भीती संपुष्टात आली असतानाच पुन्हा एकाच दिवसात कोरोना बाधितांची संख्या नऊ वरून 19 वर पोहोचली आहे. तर चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. एका दिवसात झालेल्या वाढीमुळे आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले असून चाचण्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान कोरणा प्रलंबित अहवालांची संख्या 325 झाली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे 218, नाशिक मनपाचे 54 तर मालेगावचे 53 अहवाल प्रलंबित आहेत. 


पॉझिटिव्हिटी रेट 2.6 टक्के 
मागील तीन महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट एक टक्क्यांखाली होता. मात्र मागील तीन दिवसांपासुन पॉझिटिव्हिटी रेट दर एक टक्क्यांवर कायम असला तरी शुक्रवारी हा दर दोन टक्क्यांचे नियंत्रण ओलांडून 2.46 टक्के म्हणजे अडीच टक्क्यांनजीक पोहोचला आहे. त्यातही नाशिक मनपातील पॉझिटिव्हिटी रेट 04.32 टक्के नाशिक ग्रामीण 0.67 टक्के तर जिल्हा येथे 14.29 टक्क्यांवर पोहचला आहे. ही आकडेवारी पाहता नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला असून नाशिककरांसाठी हा चिंतेचा विषय आहे. अशात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येतं आहे. 


जिल्ह्यातील उपचारार्थीं 50 हून अधिक 
जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारार्थ संख्येत वाढ झाली असून ही संख्या 53 वर पोहोचले आहे. त्यात 38 रुग्ण नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण 07, जिल्हाबाह्य 05 रुग्णांचा त्यात  समावेश आहे. बहुतांश रुग्णांकडून घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिले जात असले तरी प्रशासनाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरली आहे. 


कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नागरिकांनी भीती नसली तरी काळजी मात्र निश्चितपणे घ्यायला हवी. कोरोना बाबत मास्कपासून सुरक्षित अंतरापर्यंतचे सर्व नियम पाळायला हवे. ज्यांचा दुसरा डोस किंवा बूस्टर डोस झालेला नाही. त्यांनी तो तातडीने घेऊन स्वतःला आणि पर्यायाने कुटुंबाला संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.