नाशिक : जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने स्वॅब चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याचप्रमाणे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 71 सक्रिय रुग्ण असून ते सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. कोरोनाचा पहिला डोस घेण्याऱ्यांचे प्रमाण 89.5 टक्के, दुसरा डोस 75.24 टक्के नागरिकांनी घेतला असून बुस्टर डोस आतापर्यंत एक लाख 43 हजार 890 नागरिकांनी घेतला आहे. तसेच कोमॉर्बिड नागरिकांना देखील बुस्टर डोस देण्याबाबत नियोजन करून रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावेत. जिल्ह्यात 787 मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता असून त्यापैकी 346 मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेवून आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन व औषधसाठा तयार ठेवावा.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये पल्स ऑक्सिमीटर व मानवी तापमापक यंत्राची व्यवस्था करण्यात येऊन मुलांच्या प्राथमिक आरोग्य चाचण्या करण्यावर भर द्यावा. शाळा व महाविद्यालयांमध्ये लसीकरणाच्या कॅम्पचे आयोजन करावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बैठकीत सांगितले.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 50 हजार सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी 16 हजार 300 प्रस्ताव प्राप्त झाले त्यापैकी 12 हजार 505 प्रस्ताव मंजुर करण्यात आले असून 62 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एक हजार 862 प्रस्ताव नामंजूर झाले असून एक हजार 933 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. हे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता त्यावर लवकरात लवकर योग्यती कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
मान्सूनकाळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहा
मान्सून कालावधीचा विचार करता प्रत्येक रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात यावे. तसेच जलसंपदा व हवामान विभागाकडून सातत्याने पडणाऱ्या पावसाची माहिती घेण्यात यावी. त्या आधारे गंगापूर धरणातून एकदम पाण्याचा विसर्ग न करता पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. ज्यामुळे धरण क्षेत्रात व नदी लगतच्या भागात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. तसेच राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाशी संपर्क ठेवण्यात येवून आपत्ती निवारण अंतर्गत जिल्ह्यात उपलब्ध बोटस् व इतर आवश्यक साहित्याची तरतूद करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.