Nashik Voter List : आगामी निवडणुका (Nashik NMC Election) संदर्भात मतदार यादी प्रमाणीकरण (Voter List) करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे मतदारांकडून आधारची (Voter Aadhar) माहिती संकलित करण्यात येणार असून ही माहिती देणे मतदारांना देणे ऐच्छिक असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल (Election Commissioner Swati Thavil) यांनी सांगितले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2022 ते 1 एप्रिल 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादीतील तपशील प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलीत करण्याकरीता 4 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, मतदार यादीतील विद्यमान मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला असून ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबीराच्या माध्यमातून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फतही घरोघरी भेटी देऊन माहिती संकलीत करण्यात येणार आहे.
याबाबत https://nvsp.in/ किंवा https://ceo.maharashtra.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असेल, असेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी सांगितले आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीत नांव असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले आहे. मतदारांसाठी आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक असणार आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल म्हणाल्या...
दरम्यान मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे, तसेच एकाच व्यक्तिचे एकापेक्षा जास्त मतदार संघात अथवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नावाची नोंदणी तपासण्यासाठी आणि मतदारांची ओळख प्रस्थापित करणे, तसेच भविष्यात मतदारांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने मतदारांकडून आधार क्रमांकाचे संकलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचा आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळता येणार नाही, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी कळविले आहे.