Nashik Rain : राज्यात सगळीकडे पाऊस सुरु असताना मात्र नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात 'पड रे पाण्या पड रे पाण्या कर पाणी पाणी' अशी म्हणायची वेळ सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु असल्याने पुढील 'काही दिवस पावसाचे' अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यात जवळपास सर्वदूर पावसाने हजेरी लावली असतांनाच नाशिककडे मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. अशातच पावसाने आज सकाळपासून बरसण्यास सुरवात केली असून आज पहाटेपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे. 


जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटून देखील नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली नव्हती आणि यामुळे पेरण्या तर खोळंबल्या होत्याच सोबतच नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट देखील ओढावले होते. जिल्ह्याचा पाणीसाठा 24 टक्क्यावर आला होता. सोबतच शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर (Gangapur Dam) धरणाचा जलसाठा देखिल 22 टक्क्यापर्यंत आल्याने 15 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्यास नाशिककरांना पाणीकपातीला सामोरं जावं लागणार होतं. मात्र आता हे संकट देखील दूर होईल अशी आशा आहे. 


नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाला असून आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने नाशिककरांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. शिवाय नाशिकच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला आहे. आज पहाटेपासून पाऊस सुरु आहे. आठ वाजेपासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत नाशिक शहरात 39.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 


दरम्यान जून महिन्यात पाठ फिरवल्यानंतर जुलैच्या सुरवातीपासूनच पावसाने रिमझिम का होईना कमबॅक केले होते. मात्र नाशिक शहरासह जिल्ह्यास जोरदार पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून नाशिकमध्ये देखील पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


नाशिकला ऑरेंज अलर्ट 
हवामान विभागाने नाशिकची आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सकाळापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यातिमुरधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.