Sanjay Raut : नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेले खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे न देताच राऊतांनी प्रेस गुंडाळल्याचे दिसून आले. त्यामुळे खासदार संजय राऊत पुन्हा 'नो कॉमेंट्स' पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) पक्षाला गळती लागली. हीच गळती भरून काढण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले नाशिक हे शिवसेनेचे महत्वाचं केंद्र आहे. शिवाय प्रत्येकवेळी नाशिक बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहिले आहे. तिकडे काय चाललंय, याकडे नाशिककरांनी लक्ष देऊ नये, नाशिक, नांदगाव, मालेगाव मधील प्रत्येक शिवसैनिक आज शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे. तर नाशिकचे सगळे नगरसेवक माझ्या सोबत आहेत, त्यामुळे नाशिकपासून हि सुरवात करतो आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले. यामध्ये संजय देशपांडे यांच्या कारवाई बाबत विचारले असता, मला माहित नाही असे उत्तर त्यांनी यावेळी दिले. तर राजकीय घडामोड सुरु असताना संजय राऊत एकदा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उद्देशून वेश्या बोलले होते. यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता ते ते सोडून द्या, राजकीय प्रश्न विचारा असे सांगून राऊतांनी प्रश्न टाळला. पुढे जाऊन काल भाजपचे प्रवक्ते किरीट सोमैय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे माफिया सरकार पायउतार झाले. या ट्विटनंतर शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी याबाबत आक्षेप नोंदविला. आम्ही आजही उद्धव ठाकरेंना मानतो, अशा पद्धतीचे बोलणे चुकीचे असल्याचे केसरकरांनी सांगत किरीट सोमैय्या यांची कानउघाडणी केली होती. या प्रश्नावर देखील संजय राऊतांनी दुर्लक्ष करा, असे सांगितले.
संजय पांडे कोण?
संजय पांडे हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असून ते काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते. याच संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास संस्थांनी संजय पांडे यांच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत. संजय पांडे यांच्या विरोधात आतापर्यंत सीबीआयने ३ आणि ईडीने २ एफआयआर नोंदविल्या आहेत. एनएसईच्या कर्मचाऱ्यांच्या फोनचे २००९ ते २०१७ या कालावधीत बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.