Pregnancy Tips : प्रत्येक महिलेसाठी गर्भधारणेचा काळ (Pregnancy Tips) हा खूप खास असतो. या काळात माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी गर्भधारणेपूर्वीपासून ते बाळ दोन वर्षांचं होईपर्यंतचा कालावधी हा फार महत्त्वाचा असतो. माता आणि बालकांची गर्भधारणे पूर्वीपासून महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी गर्भधारणापूर्व, प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर माता आणि बालसंगोपनाच्या विविध योजनांच्या कार्यक्रमांचे एकत्रिकरण करुन राज्यात ‘वात्सल्य’ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यात ‘वात्सल्य’ कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.


‘वात्सल्य’ कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये



  • वात्सल्य कार्यक्रमाची काही महत्त्वाची उद्दिष्ट्ये आहेत. ती खालीलप्रमाणे

  • कमी दिवसांचे आणि कमी वजनी बालकांच्या जन्माचं प्रमाण कमी करणे

  • उपजत बाळाच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे  

  • निरोगी गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी माता आरोग्यात सुधारणा करणे,

  • गर्भधारणेपूर्वीच मातेच्या आरोग्याची जोखीम ओळखणे आणि त्याचा पाठपुरावा करणे,

  • बालकाच्या हजार दिवसांच्या वाढीची सातत्यपूर्ण देखरेख करणे 


गर्भधारणापूर्व आरोग्य तपासणी


गर्भधारणापूर्व आरोग्य तपासणी या कार्यक्रमात पूर्णत: गर्भधारणापूर्व आरोग्य तपासणी केली जाणार आहे. माता आणि बालकांना आरोग्यासाठी असलेली जोखीम विविध टप्प्यात ओळखणे आणि आवश्यक सेवेद्वारे जोखीमीचे व्यवस्थापन, बालकांच्या वजन वाढीचे आलेखाद्वारे आकलन केले जाणार आहे. तसेच, एच. आय. व्ही. होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येणार आहेत. 


आय. एफ. ए., फॉलिक ॲसिड, मल्टिमायक्रोन्यूट्रिएन्ट्स, ‘ड’ जीवनसत्व, लसीकरण तसेच अन्य उपचारही देण्यात येणार आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आदी रक्तासंबंधी गुंतागुंत आजारांचे, अतिजोखिमेच्या मातांचे लवकर निदान, उपचार आणि व्यवस्थापन करण्यात येणार आहे.  


'या' कार्यक्रमाचा समावेश 


बाळाच्या 1 हजार दिवसापर्यंतच्या वाढीचे मूल्यमापन करताना वेळोवेळी एएनएम कार्यकर्ती भेटी देणार असून बाळाच्या मातेला लोहयुक्त गोळ्या, कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्व आदी उपचार, तपासणी यांसारख्या सेवा देणार आहेत. वात्सल्य कार्यक्रमात प्रामुख्याने समुपदेशन, माता आणि बालकाची वाढ आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामध्ये बालकाचा पूरक आहार, स्तनपान यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमामुळे राज्यातील सर्व घटकातील महिला तसेच बालकांचा योग्य शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Pregnancy Tips : गरोदरपणात महिलांना अन्न पाहताच उलटी का होते? अन्नाचा वासही का सहन होत नाही? 'हे' आहे यामागचं कारण