Nashik Crime : नाशिकसह जिल्ह्यात दरोडा, घरफोडीचे सत्र सुरूच असून ग्रामीण पोलिसांकडून (Nashik rural Police) धडक कारवाई केली जात आहे. अशा संशयित चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जात असून हळूहळू दरोडा, घरफोडीच्या घटनांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. अशातच सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीपैकी पाच जणांना नाशिकच्या मालेगावमध्ये (Malegaon) पवारवाडी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले तर दोघे जण फरार झाले. 


नाशिक (Nashik) शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik police) कंबर कसली असून दुसरीकडे नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी धडक मोहिमा सुरु आहेत. मालेगाव शहर पोलिसांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी कंबर कसली असून रोजच गुन्हेगारी प्रवुत्तीच्या संशयितांना ताब्यात घेतले जात आहे. आज सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीपैकी पाच जणांना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी या संशयितांकडून दोन गावठी पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, दोन धारदार तलवारी, एक चाकूसह एक दुचाकी असा 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


मालेगाव शहरातील (Malegaon) अकरा हजार कॉलनी परिसरात काही संशयित दरोड्याच्या उद्देशाने लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत छापा मारून पाच जणांना ताब्यात घेतले. यातील काही संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मालेगावच्या विविध स्थानकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान मालेगावमध्ये शस्त्र सापडण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.


शस्त्रांसह एक संशयित ताब्यात..


तसेच शस्त्रांची मांडणी करून व्हिडिओ व्हायरल करणे, एकाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी या संशयिताला धारधार शस्त्रांसह ताब्यात घेतले. अमीन अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुन्हेगारांचे नाव असून त्याच्याकडून दाेन धारदार चाॅपर, तलवार, काेयता, रेम्बाे चाकूसह दाेन लाकडी स्टीक हस्तगत केल्याने खळबळ उडाली. अमीनने घरात शस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने त्याने शस्त्र मांडून व्हिडीओ व्हायरल केला होता. पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्या नेतृत्वाखालील विशेष पाेलिस पथकाने गुलशेरनगर भागात काेम्बिंग ऑपरेशन राबवित संशयित अमीन अन्सारी यास या शस्त्रांसह ताब्यात घेतले. त्याने राजस्थानच्या पुष्कर भागातून ही शस्त्रे आणल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान शस्त्र बाळगणाऱ्या अमिन विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik News : पेट्रोल न मिळाल्याने आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोल पंपावर तोडफोड, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद