Nashik 12th Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज पासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात जवळपास 108 केंद्रावर 74 हजार 780 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मात्र दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन (Protest) अद्यापही सुरूच असून जिल्हाभरात जवळपास 800 हून अधिक कर्मचारी संपावर गेल्या गेल्याने बारावीची परीक्षा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.


आज पासून नाशिक जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना (12th Exam) सुरुवात होणार आहे. नाशिक जिल्ह्यात 108 केंद्र असून 74 हजार 780 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आठ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे, महिला पथकांचा देखील समावेश असणार आहे. तर दुसरीकडे जुनी पेन्शन (Old Pension) योजना लागू करण्यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठातील अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे आज सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत अडचण निर्माण झाले आहे. प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या काळात निदर्शने सुरू झाल्याने अडचण वाढली आहे.


दरम्यान, परीक्षेचे निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना परीक्षा त्यांना देण्यात आले आहेत. सकाळ सत्रात साडेदहा तर दुपार सत्रात अडीच वाजता परीक्षा करण्यात उपस्थित राहणे आवश्यक आहे. कॉपीमुक्त वातावरण परीक्षा पार पाडावी यासाठी निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळातर्फे आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. या परीक्षा आजपासून ते 21 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागात जवळपास एक लाख 62 हजार 612 परिसरातील प्रविष्ट होणार आहेत.


शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम


शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी सुरू केलेल्या परीक्षा कामकाजावरील बहिष्कारमुळे आधीच राज्यातील विद्यापीठीय परीक्षांचा खोळंबा झाला आहे. आता बारावीच्या परीक्षेतही अडचण येणार आहे. कर्मचाऱ्यांसह शिक्षकांवर आता गठ्ठे बांधणे, परिक्षार्थींचे आसन क्रमांक टाकणे, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका गठ्ठे जुळवणे, लिहिलेल्या पेपर गठ्ठे आणि बॉक्समध्ये भरून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवणे, या कामांसाठी शिक्षकांनाच करावे लागत असल्याने परीक्षा सुपरव्हिजनसह नियोजन कामातही अडचणी वाढल्या आहेत. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उद्यापासून सुरु होणाऱ्या बारावीच्या परीक्षांवर आम्ही बहिष्कार टाकू, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असा ईशारा नाशिकमधील आंदोलनकर्त्या शिक्षकेतर संघटनांनी दिला आहे.